नवी दिल्ली : रायपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनाला निघालेले काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. एक दिवसापूर्वी आसाम पोलिसांनी त्यांच्यावर दिमापूरमध्ये जातीय तेढ आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गुन्हा दाखल केला होता.
तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी खेरा यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून उतरवले. रायपूरमध्ये शुक्रवारपासून सुरू होणा-या काँग्रेसच्या अधिवेशनात खेरा सहभागी होणार होते. या कारवाईच्या निषेधार्थ विमानात उपस्थित असलेले इतर काँग्रेस नेते भाजपविरोधात घोषणाबाजी करत विमानातून खाली उतरले. इंडिगोच्या विमानात उपस्थित असलेले प्रवासी रणजीत कुमार यांनी घटनेची माहिती दिली. खेरा रायपूरला जाण्यासाठी विमानात बसले होते. यानंतर कर्मचा-यांनी त्यांना सांगितले की, त्यांच्याविरुद्ध डीसीबीची नोटीस आहे. याप्रकरणी हजरतगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यानंतर त्यांना सांगण्यात आले की तुम्ही फ्लाइटने जाऊ शकत नाही.
सामान तपासण्यासाठी उतरवले
दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारला असता खेरा म्हणाले दिल्ली पोलिस अधिकारी माझ्याकडे आले आणि म्हणाले की तुमचे सामान तपासायचे आहे. मी म्हटले की कोणतेही सामान नाही. तरीही ते म्हणाले, आमच्यासोबत चला, आता डीसीपी तुमच्याशी बोलतील. मी वाट पाहत राहिलो, डीसीपी आले नाहीत. नियम आणि कायदे काय आहेत हे मला माहीत नाही. मी तर त्यांची वाट पाहत आहे.