नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावली आहेत. यामुळे काँग्रेस रविवारी (ता. १२) देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. सोनिया यांना यापूर्वी ८ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, सोनिया यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ईडीकडे नवीन तारीख मागितली होती.
सोनिया गांधी यांना दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्यासाठी २३ जूनची तारीख देण्यात आली आहे. जिथे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जबानी नोंदवली जाईल. याप्रकरणी राहुल गांधी यांचीही १३ जून रोजी चौकशी होण्याची शक्यता आहे. राहुल यांना यापूर्वी २ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते परदेश दौ-यावर असल्याने नवीन तारीख मागितली होती. ईडीने त्यांना १३ जून रोजी समन्स बजावले आहे.
केंद्र सरकार तपास यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने निर्णय घेतला आहे की १३ जून रोजी राहुल गांधी ईडीसमोर हजर होतील तेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार ईडी कार्यालयाबाहेर आणि दिल्लीत सत्याग्रह करतील. मुख्यालयावर मोर्चा काढणार आहोत. पक्ष-समर्थित यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीशी संबंधित हे प्रकरण आहे.
यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध आयकर विभागाच्या तपासाची दखल येथील एका ट्रायल कोर्टाने घेतल्यानंतर एजन्सीने पीएमएलएच्या फौजदारी तरतुदींनुसार नवीन गुन्हा नोंदवला होता. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर फसवणूक आणि निधीच्या गैरव्यवहाराचा कट रचल्याचा आरोप केला होता. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने काँग्रेसचे एजेएलचे कर्ज असलेले ९०.२५ कोटी वसूल करण्याचा अधिकार मिळविण्यासाठी ५० लाख रुपये दिले, असा आरोप स्वामी यांनी केला होता.