24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५० हजाराची मदत

कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५० हजाराची मदत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे देशात आतापर्यंत ४ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेकडो मुले अनाथ झाली आहेत. आता कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर एनडीएमएने भरपाईसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

केंद्र सरकारने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यानुसार देशात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना ५० हजारांची मदत देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई देऊ शकत नाही, असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले. सरकारच्या या युक्तिवादाशी सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली. तसेच सरकारने स्वत: अशी व्यवस्था तयार करावी, जेणेकरून मृतांच्या वारसांना सन्माननीय रक्कम मिळाली पाहिजे, असें कोर्टाने नमूद केले.

भूकंप, पूर यासारख्या १२ प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती या आपत्ती कायद्याच्या कक्षेत येतात. या आपत्तींमध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती निवारण निधीतून ४ लाख रुपयांच्या भरपाईचे आश्वासन दिले जाते. पण कोरोना महामारी त्यापेक्षा वेगळी आहे, असा युक्तीवाद सरकारने सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला उत्तर देत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारचा हा युक्तिवाद मान्य केला. कोरोना मृतांच्या वारसांना किती रक्कम द्यायची हे सरकारने स्वत: ठरवावे. पण नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते.

देशात ४ लाख ४५ हजारांवर मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ७६८ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कोरोना बळींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागणार आहे. अर्थात, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपये मिळणार आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या