22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयदेशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात भारतासाठी एक चांगली बातमी आहे. कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचा वेग (रिप्रोडक्शन रेट ) म्हणजे आर व्हॅल्यू नियंत्रणात आहे. व्हायरसच्या उत्पत्तीचा दर दोन आठवडे १ च्या खाली राहिला, तर परिस्थिती नियंत्रणात आहे, असे म्हणता येईल, असे अभ्यासगटाने म्हटले आहे.

अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीच्या सीओव्ही-आयएनडी स्टडी ग्रुपने आपले निरीक्षण नोंदवले आहे. गेल्या एका आठवड्यापासून कोरोनाच्या उत्पत्तीचा दर हा १ च्या खाली आहे. याचा अर्थ असा की एखादा रुग्ण जो कोरोना बाधित आहे, त्याच्याकडून एकापेक्षा कमी व्यक्तींना संसर्ग होत आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गपासून ते आतापर्यंत पहिल्यांदाच कोरोनाचा उत्पत्ती दर हा १ च्या खाली आला आहे आणि हा दर कायम आहे. जर दोन आठवड्यांपर्यंत कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचा दर हा १ च्या खाली राहिला, तर परिस्थिती नियंत्रणात आहे, असे म्हणता येईल, असे या अभ्यासगटाने म्हटले आहे.

भारत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यास किती सक्षम आहे, हे कोरोना व्हायरसचा उत्पत्ती दर हा सतत १ च्या खाली असण्यावरून स्पष्ट होते. भारतात वाढत्या चाचण्यामुळे कोरोनाचा उत्पत्ती दर घसरला आहे. गेल्या ७ दिवसांत भारतातील कोरोना व्हायरसचा उत्पत्ती दर हा १ च्या खाली आहे. त्यामागचे कारण म्हणजे देशभरात एकूण ७५ लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि दररोज सरासरी दहा लाखांहून अधिक चाचण्या होत आहेत.

संसर्गाच्या दरात घट
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून भारतात प्रथमच २१ सप्टेंबरला कोरोनाचा उत्पत्ती दर १ च्या खाली आला, अशी मिशिगन युनिव्हर्सिटी अ‍ॅपच्या अनुसाराने समोर आले आहे. व्हायरसच्या आलेखात खरोखरच आशावादी कल दिसून आला आहे. चाचण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने राष्ट्रीय आकडे उत्साह वाढवणारे आहेत, असे मिशिगन कॅन्सर सेंटर युनिव्हर्सिटीच्या महामारी विज्ञानाचे प्राध्यापक भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले.

महाराष्ट्रातही मंदावला वेग
महाराष्ट्रातीला ताजे आकडेवारीत करोना प्रादुर्भावाचा वेग हा ०.९३ इतका नोंदविला गेला आहे. जो राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी २२ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात १०० कोरोना बाधित रुग्ण नवीन ९३ जणांना बाधित करत आहेत. यानुसार व्हायरच्या प्रादुर्भावाचा वेग हा मंदावत चालला आहे.

अधिक रुग्ण असलेल्या राज्यांमधून चांगले संकेत
ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत, तिथेही कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग मंदावला आहे. देशातील १४ राज्यांमध्ये कोरोना प्रादुर्भावाचा दर किंवा उत्पत्तीचा दर हा १ च्या खाली असल्याचे २६ सप्टेंबरपासूनच्या आकड्यांवरून स्पष्ट होते. यानुसार भारतातील राष्ट्रीय सरासरी प्रमाण ०.९६ इतके आहे, तर ९ राज्यांत कोरोना प्रादुर्भावाचा वेग हा राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे.

देशात ८६ हजारांवर रुग्णांची कोरोनावर मात
ळ देशात गेल्या २४ तासांत ८६ हजारांवर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ८० हजार ४७२ नवे रुग्ण सापडले आहेत. नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण जास्त आहे तसेच १ हजार १७९ बाधितांचा मृत्यू झाला. मंगळवारी ७० हजार रुग्ण आणि ७७६ जणांचा बळी गेला होता. कालच्या तुलनेत आजची संख्या वाढली असली, तरी कोरोनामुक्त रुग्ण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. देशात एकूण रुग्णसंख्या ६२ लाख २५ हजार ७६४ वर गेली असून, यापैकी ५१ लाख ८७ हजार ८२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ९ लाख ४० हजार ४४१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून, आतापर्यंत ९७ हजार ४९७ रुग्णांचा बळी गेला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या