नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेली चक्रीवादळांची मालिका या आठवड्यातही कायम राहणार आहे. दक्षिण भारताला गेल्याच आठवड्यात जोरदार चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवला होता. ऐन थंडीत राज्याच्या अनेक भागात ढगांची दाटी झाली होती. आता हे वादळ शमतंय न शमतंय तोवर एका नव्या वादळाची नांदी बंगालच्या उपसागरात झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा दक्षिण भारतावर चक्रीवादळाचे सावट निर्माण झाले आहे.
हवामान विभागाने (आयएमडी)दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढच्या २४ तासांत याचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ पूर्व किनारपट्टीवर कमी तीव्रतेचे चक्रीवादळच घोंघावणार आहे. याचा परिणाम म्हणून पुढचे चार दिवस तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळ – आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील थंडी लांबली
अंदमानच्या समुद्रात निर्माण होत असलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला, तरी या दक्षिण भारतातल्या चक्रीवादळामुळे राज्यात अपेक्षित असलेली थंडी आणखी लांबली आहे. नोव्हेंबर महिन्यात मोजून दोन-तीन दिवस चुणूक दाखवून या वर्षी थंडी गायब झाली आहे.
मराठवाड्यात थंडीची प्रतिक्षाच
पुढचे काही दिवस तरी राज्यात सध्याच्या वातावरणात फारसा फरक होणार नसल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. म्हणजे थंडीसाठी अजूनही प्रतिक्षाच करावी लागणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात थंडीसाठी सुयोग्य असे स्वच्छ, कोरडे हवामान नसेल. त्याऐवजी मळभ असेल आणि तुरळक ठिकाणी पाऊसही होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
चीनकडून पाणी रोखण्याचे राजकारण