भोपाळ : दोन खेळाडू किंवा दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळताना कोणीतरी एक जिंकतो, आणि दुसरा पराभूत होतो. म्हणून कोणी न्यायालयात धाव घेत नाही. मात्र अनेकांना आपण पराभूत होऊच शकत नाही असे वाटते आणि त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होते. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही असेच काहीसे झाले. येथे कौटुंबिक न्यायालयात एक अजबच प्रकरण आले आहे. यात एका मुलीने आपल्या वडिलांच्याविरुद्ध दावा ठोकला आहे. वडिलांची चूक एवढीच की लुडो खेळताना त्यांनी आपल्या मुलीला पराभूत केले.
शनिवारी एका 24 वर्षीय तरुणीने वडिलांविरोधात जात कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. लुडो खेळताना वडिलांनी आपली फसवणूक केली आणि विजय मिळवला असा या मुलीचा आरोप आहे. न्यायालयाच्या कौन्सलर सरिता यांनी याबाबत बोलताना सांगितले की, तरुणीचा वडिलांवर विश्वास होता, ते विश्वासघात करून जिंकतील असे तिला वाटत नव्हते. त्यामुळे तिने कौटुंबिय न्यायालयात धाव घेतली. तिच्यासोबत आता 4 काउंसलिंग सेशन बोलवण्यात आल्याचे सरिता यांनी सांगितले.
तरुणीने याबाबत बोलताना सांगितले की, मला खुश करण्यासाठी वडील जाणूनबुजून पराभूतही होऊ शकले असते. मात्र त्यांनी तसे केले नाही आणि फसवणूक करून विजय मिळवला. यामुळे मला धक्का बसला असून वडिलांबाबतचा आदर, सन्मान समाप्त झाला आहे.
स्वामी समर्थ केंद्रामध्ये पौर्णिमा मोहिते हिने केली सुंदर पेंटिंग