37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीय‘देसी ट्विटर’ची चर्चा

‘देसी ट्विटर’ची चर्चा

एकमत ऑनलाईन

ट्विटर हा अत्यंत लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्म सध्या गाजतो आहे केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये सुरू झालेल्या वादामुळे. सध्याच्या वादाला शेतक-यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी असली तरी ‘आता तुझे दिवस भरले,’ असा इशारा ट्विटरवरून प्रत्येकाला देणा-या कंगना राणावतनेसुद्धा हाच इशारा खुद्द ट्विटरला दिला म्हणजे वाद निश्चितच विकोपाला गेला आहे. वास्तविक सोशल प्लॅटफॉर्म सुरक्षित नाहीत आणि वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा ते दुरुपयोग करतात हे वारंवार समोर आलेले असूनसुद्धा या प्लॅटफॉर्मवरची गर्दी हटत नाही. या प्लॅटफॉर्म्सनी जग जवळ आणले असले तरी आता मात्र काही बाबतीत जग लांबच जाण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेषत: परदेशी सोशल मीडिया वापरणे योग्य नाही, असे व्हॉट्स अ‍ॅपच्या ताज्या ‘प्रायव्हसी पॉलिसी’ प्रकरणामुळे अनेकांना वाटू लागले आहे. त्यातच ट्विटरविरोधी वादात सरकारने कडक भूमिका घेतल्यामुळे ट्विटरला देशी पर्यायाचा शोध सुरू झाला आणि त्यातूनच ‘कू अ‍ॅप’ हा पर्याय सध्या समोर आला आहे. एका स्टार्टअप कंपनीने कू अ‍ॅप तयार केले असून, सरकारनेही त्याला पाठबळ दिल्यामुळे त्याचा प्रसार होण्यास फार वेळ लागणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अ‍ॅपचा उल्लेख केल्यामुळे ते अधिक चर्चेत आले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरविरुद्धच्या वादात कठोर भूमिका घेऊन भारतीय कायद्यांचे उल्लंघन करू नये, असे ट्विटरला बजावले. शेतकरी आंदोलनादरम्यान प्रक्षोभक सामग्री ट्विटरवरून हटविण्यास सांगितले; मात्र ट्विटरने त्याचे तंतोतंत पालन केले नाही. मग प्रसारण मंत्रालयाबरोबरच पीयुष गोयल यांच्यासारख्या काही मंत्र्यांनी थेटपणे कू अ‍ॅपचे स्वागत आणि समर्थन केले. त्याचा वापर करण्याची भारतीयांना विनंती केली आणि बघता-बघता कू अ‍ॅपच्या वापरकर्त्यांमध्ये रातोरात दसपट वाढ झाली. कू अ‍ॅप वापरणा-यांना त्याची जन्मकथा आणि निर्मात्यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता यामुळे वाढली. गेल्या वर्षी या अ‍ॅपची सुरुवात अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावत यांनी केली होती. वापरकर्त्यांना आपले म्हणणे भारतीय भाषांमध्ये मांडता यावे यासाठी हिंदी, तेलुगू आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले. इन्फोसिसचे माजी कार्यकारी अधिकारी टी. व्ही. मोहनदास यांनी या अ‍ॅपला समर्थन दिले आहे आणि गेल्याच आठवड्यात एक्सल, कलारी कॅपिटल, ब्लूम व्हेंचर्स अँड ड्रीम इन्क्युबेटर आणि थ्रीवनफोर कॅपिटल यांच्या माध्यमातून या अ‍ॅपने ४१ लाख डॉलर जमविले होते. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेंजमध्ये हे अ‍ॅप विजेता ठरले आहे.

ट्विटरप्रमाणेच कार्यपद्धती असलेल्या कू सोशल नेटवर्कच्या मंचावर आतापर्यंत ३० लाखांहून अधिक वापरकर्ते जमले आहेत. मयंक बिदावत यांच्या म्हणण्यानुसार, १५ लाख सक्रिय वापरकर्त्यांसह एकूण २० लाख वापरकर्ते त्यांच्याकडे आधी होते. या संख्येने आता ३० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या ट्विटरचे १.७५ कोटी वापरकर्ते असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी ट्विटरचाच वापर करतात. या वापरकर्त्यांच्या तुलनेत कू अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या सध्या खूपच कमी दिसत असली तरी सरकारनेच ‘प्रमोट’ केलेले माध्यम असल्यामुळे ही संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही, अशी चिन्हे आहेत. ट्विटरचे हे भारतीय व्हर्जन लाँच झाले तेव्हाच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालून सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली त्याच दरम्यान हे लाँचिंग झाले होते. ट्विटरशी हे अ‍ॅप अगदीच मिळतेजुळते आहे. यामध्ये जशा पोस्ट टाकता येतात तशाच पोस्टना फोटो आणि व्हीडीओ अटॅच करता येऊ शकतात. ऑडिओ, व्हीडीओ आणि टेक्स्ट असे तीन ऑप्शन वापरकर्त्याला या अ‍ॅपमध्ये मिळतात. ट्विटरच्या बोधचिन्हात जसा निळा पक्षी आहे तसा कू अ‍ॅपच्या बोधचिन्हात पिवळा पक्षी दिसतो.

लॅपटॉप, टॅबलेट उत्पादनावर भर; पीएलआय योेजनेला केंद्राची मंजुरी

ट्विटरबरोबर झालेल्या वादात सरकारने ट्विटरला काही आक्षेपार्ह खाती बंद करायला सांगितले होते. त्यातील काही खाती ट्विटरने बंद केली तर काही तात्पुरती स्थगित केली. त्यानंतर बंद केलेल्या खात्यांपैकी काही पुन्हा सुरू केली. एवढेच नव्हे तर लोकांच्या अभिव्यक्तीवर असे निर्बंध आणता येणार नाहीत, असे सरकारलाच उलट सुनावले. त्यानंतर हीच माहिती इंटरनेटवर शेअरसुद्धा केली. वास्तविक, ज्याविषयी चर्चा अद्याप सुरू आहे असे विषय तातडीने इंटरनेटवर टाकणे योग्य नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. आता ट्विटर विरुद्ध सरकार हा वाद सोशल माध्यमांवर सुरू झाला आहे. ट्विटर स्वत:च्या व्यासपीठावरून तर सरकार कू अ‍ॅपवरून म्हणणे मांडत आहे. त्यामुळेही कू अ‍ॅपचे महत्त्व वाढले आहे. केंद्रीय मंत्र्यांपाठोपाठ अनेक सेलिब्रिटींनी कू अ‍ॅपवर खाते सुरू केले आहे. हे अ‍ॅप भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे वापरकर्त्यांना अधिक फायदेशीर आहे आणि त्यामुळेच त्याचे वापरकर्ते आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्विटर विरुद्ध सरकार हे भांडण आता विकोपाला गेले असून ‘आमच्याकडे व्यवसाय करायचा असेल तर आमचे कायदे पाळावे लागतील,’ असे सरकारने स्पष्टपणे बोलून दाखविल्यामुळे या वादाची धार वाढली आहे. कू अ‍ॅपचे वापरकर्ते वाढल्यास पब-जी आणि टिकटॉकप्रमाणे ट्विटरची अवस्था होऊ शकते आणि देशी कू अ‍ॅप अचानक लोकप्रिय होऊ शकते.

ट्विटरविरुद्धचा वाद चिघळल्यावर ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर (इंडिया अँड साऊथ एशिया) महिमा कौल यांनी पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. आपण व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा दिला असल्याचे महिमा कौल यांनी म्हटले असले तरी त्यांच्या राजीनाम्याकडे भारत सरकार विरुद्ध ट्विटर या वादाचा परिणाम म्हणूनच पाहिले जात आहे. गेल्या आठवड्यातच सरकारने ट्विटरला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जाब विचारला होता आणि त्याच आठवड्याच्या शेवटी महिमा कौल यांनी राजीनामा दिला. सरकारने ट्विटरला ११७८ खाती बंद करण्याचे आदेश दिले होते. निर्देशांचे पालन केले नाही तर कायद्यानुसार दंड आणि सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, असेही सुनावले. यासंदर्भातील नोटीस सरकारने ट्विटरला पाठविल्यानंतर आपण सरकारबरोबर बातचित करू इच्छितो असे ट्विटरने सांगितले. कर्मचा-यांची सुरक्षितता आपल्या दृष्टीने प्राधान्यक्रमाचा विषय असल्याचेही ट्विटरने म्हटले. दरम्यान, वाद चिघळल्याने आणि मंत्र्यांसह अनेकांनी कू अ‍ॅपचा खुलेपणाने पुरस्कार केल्याने कू अ‍ॅप लोकप्रिय होऊ लागले. कू ही एक मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. आठ भाषांमध्ये उपलब्ध असलेले हे ‘देशी ट्विटर’ जसे अ‍ॅप म्हणून वापरता येऊ शकते तसेच वेबसाईट म्हणूनही वापरता येते. त्याचा इंटरफेस ट्विटरसारखाच आहे. म्हणणे मांडण्यासाठी प्रत्येक वापरकर्त्याला ३५० शब्दांची मर्यादा दिली आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी फंडिंग दिल्यामुळे कू अ‍ॅप आणखी सशक्त झाले
आहे.

हे कू अ‍ॅप ट्विटरला टक्कर देईल का, या विषयावर सध्या चर्चा सुरू आहे. मात्र ज्याप्रमाणे पब-जी वगैरे गेम्सना देशी पर्याय आले; पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, तसे कू अ‍ॅपचे होईल असे सध्या तरी वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे खुद्द सरकारने केलेले ‘प्रमोशन’ आणि भक्कम आर्थिक पाठबळ. याखेरीज सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिल्यामुळे कू अ‍ॅपच्या प्रसाराला चालना मिळाली असून, येत्या काही दिवसांतच त्याचे परिणाम दिसतील अशी शक्यता आहे. अशाच प्रकारे सर्व सोशल प्लॅटफॉर्मना भारतीय पर्याय उपलब्ध झाल्यास अनेक गोष्टी एकाच वेळी साध्य होतील.

महेश कोळी
संगणक अभियंता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या