लखनऊ : वाराणसी येथील वादग्रस्त ज्ञानवापी मशीद प्रकरणात सर्व्हेच्या अहवालावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष अधिवक्ता आयुक्तांकडून अहवाल सादर होण्यापूर्वी हिंदू पक्षकारांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले आहे. वादी पक्षाला पाठिंबा असलेल्या विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांनी म्हटले की या संपूर्ण प्रकरणाचा गुंता वाढवण्यात आला आहे.
बिसेन यांनी म्हटले की , ज्ञानवापी प्रकरणात तिसरा पक्ष दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. वादी पक्षकारांमध्ये वेगवेगळ्या दिशांना जाण्याची चढाओढ लागली आहे. तर वादी पक्षातील महिलांनी म्हटले आहे की, बिसेन चुकीचे आरोप लावत आहेत. वादी राखी सिंहचा नातेवाईक असल्याने जितेंद्र सिंह बिसेनच्या या विधानाला गांभीर्याने घेण्यात येत आहे.
वादी पक्षाच्या लोकांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा
बिसेन यांनी म्हटले आहे की, वादी पक्षाच्या लोकांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीला केवळ मी आणि अधिवक्ता हरिशंकर जैन होतो. परंतू माहिती नाही की या प्रकरणात आता इतके चेहरे समोर कसे काय आले आहेत. कोणाचेही नाव न घेता त्यांनी हिंदुत्वाचं कॉपीराईट असल्याचा दावा करणा-यांकडून या प्रकरणाचा गुंता वाढवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, ज्ञानवापी प्रकरणात तिसरा पक्ष तयार होत आहे. जो माझ्यामध्ये आणि अधिवक्ता हरिशंकर जैन यांच्यामध्ये फूट पाडत आहे. त्यामुळे वादी पक्षाने सावध रहावे, कारण तिसरा पक्ष यामध्ये फायदा उठवण्याच्या तयारीत आहे.
प्रकरण आंतरराष्ट्रीय बनवण्यात आले
यापूर्वी माध्यमांशी बोलताना जितेंद्र सिंह बिसेन यांनी म्हटले की, ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्ष फुटला आहे. दुर्देव आहे की, जेव्हापासून ज्ञानवापी प्रकरण चर्चेत आले आहे. तेव्हापासून अनेक लोक पक्षकार बनण्याचा प्रयत्न करत आहेत. वादी पक्षाचे लोक वाट चुकले आहेत, ते आता कळसुत्री बाहुले बनले आहेत. त्यांना कळत नाहीए की ते काय करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. जर सर्व्हे कमिशन टीमने शांततेत आपला अहवाल दिला असता तर ठीक होते. पण दोन दिवसाचा वेळ देणं, प्रकरणाचा गुंता वाढवणे, प्रकरणावर मीडिया ट्रायल्स होणे, याप्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे या गोष्टी समजण्यापलिकडे आहेत.