नवी दिल्ली : लोकशाही सुधारणा असोसिएशनने सादर केलेल्या रिपोर्टनुसार तामिळनाडूमधील डीएमके हा प्रादेशिक पक्ष सर्वांत श्रीमंत आहे. द्रविड मुन्नेट्र कळगम हा तामिळनाडूमधील मोठा राजकीय पक्ष असून सध्या या पक्षाची तामिळनाडूत सत्ता आहे. सध्या भारतात ३१ राजकीय प्रादेशिक पक्ष आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्वांत जास्त खर्च आणि उत्पन्न असलेल्या पक्षांचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये डीएमके हा सर्वांत जास्त उत्पन्न असणारा पक्ष ठरला आहे.
लोकशाही सुधारणा असोसिएशनने शुक्रवारी हा रिपोर्ट सादर केला आहे. त्यामध्ये देशातील ३१ प्रादेशिक राजकीय पक्षांच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये स्टॅलिन हे अध्यक्ष असलेला पक्ष डीएमके पक्षाचे उत्पन्न १५० कोटी असल्याचे सांगितले आहे. तसेच या पक्षाचा २०२०-२१ या आर्थिक वर्षातील खर्च २१८ कोटी आहे. त्याचबरोबर डीएमके पक्षाच्या वार्षिक उत्पन्नात सर्वांत जास्त वाढ झाली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षा २०२०-२१ या आर्थिक वर्षातील उत्पन्नात ८० कोटींची वाढ झाली आहे.