नवी दिल्ली : देशात आजपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरणाच्या प्रारंभीच देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिशिल्ड व कोवॅक्सिन या दोन्हीही लसी सुरक्षित असून देशवासियांनी लसींच्या सुरक्षिततेबाबत पसरवल्या जात असलेल्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन केले.
कोरोनावरील कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम स्वत: लस घ्यावी, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली होती. त्या सर्व शंकांवर मोदी यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळत प्रत्युत्तर दिले.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींनी सर्वात आधी कोरोनाची लस घ्यावी, अशी मागणी करीत लसीच्या सुरक्षिततेबद्दल शंका उपस्थित केली होती. यावरून वादंगही निर्माण झाले होते. त्यापार्श्वभुमीवर मोदींनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करत विरोधकांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. आपल्या शास्त्रज्ञांना आणि तज्ज्ञांना जेव्हा मेड इन इंडिया लसीच्या सुरक्षा आणि परिणामकारकतेबद्दल खात्री झाली, तेव्हाच त्यांनी या लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यामुळे देशवासीयांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि चुकीच्या प्रचारापासून सावध राहावे, असे आवाहन मोदींनी केले.
जगातील ६० टक्के लसींची भारतात निर्मिती
जगातील ६० टक्क्यांच्या जवळपास लहान मुलांना दिले जाणारे जीवनरक्षक डोस भारतात तयार होतात. भारतातील कठीण शास्त्रीय प्रक्रियेतून ते तयार होतात. भारतीय लसी परदेशी लसींच्या तुलनेत खूप स्वस्त आहे आणि त्याचा उपयोग करणेही सोपे आहे. विदेशात काही लसी अशा आहेत, ज्यांचा एक डोस ५ हजार रुपयांना मिळतो आणि त्यांना उणे ७० डिग्री तापमान असलेल्या फ्रिजमध्ये ठेवावे लागते,अशी लसींमधील तुलनात्मक फरकाचीही माहिती मोदी यांनी दिली.
लसीसाठी जबाबदार नेते मागे का?:तिवारी
दरम्यान लसीकरण मोहिमेवर शनिवारीही शंका उपस्थित करण्यात आली. तिस-या टप्प्यातील चाचण्यांची आवश्यकता असताना त्या न करता कोरोना लसींच्या वापरास परवानगी दिल्याचा आक्षेप काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी घेतला. तसेच लसीबद्दल एवढीच खात्री असेल तर जगभरातील नेत्यांनी लस टोचून घेतली असताना केंद्र सरकारमधील कोणत्याही महत्त्वाच्या नेत्याने ती का घेतली नाही, असा सवाल तिवारींनी उपस्थित केला.
बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघांना ६९ नकली नोटांसह अटक