श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत ड्रोनच्या सहाय्याने बॉम्ब हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला. मुलांच्या खाण्याच्या डब्यात आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले होते. हे डबे ड्रोनच्या सहाय्याने भारताच्या हद्दीत पाठवण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये काल रात्रीच्या सुमारास बीएसएफ जवानांना ड्रोनची हालचाल दिसली. जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला. तेव्हा ड्रोनला जोडण्यात आलेले पेलोड खाली पडले. आणि ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीत घुसले. खाली पडलेल्या पेलोडची तपासणी करण्यात आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.
अलीकडेच सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी सीमेतून भारतात घुसखोरी करणारं ड्रोन पाडलं होतं. संबंधित ड्रोनचं तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं आहे. यातून पाकिस्तानस्थित दहशतवादी गटाचं काळं कृत्य समोर आलं आहे. ड्रोनच्या उड्डाण मार्गाच्या विश्लेषणानुसार, संबंधित ड्रोन सर्वप्रथम भारतातून पाकिस्तानात गेलं होतं. त्यानंतर ते शस्त्रांसह परत भारतात आलं होतं. दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करत ते पाडलं.
जप्त केलेल्या ड्रोनच्या विश्लेषणात असं आढळून आलं की, संबंधित ड्रोनच्या उड्डाणाचा मार्ग हा पंजाबमधील एका ठिकाणाहून पाकिस्तानातील एका ठिकाणापर्यंत होता. त्यानुसार लोकेशन्सच्या आधारे गुन्हा दाखल करत स्थानिक पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. अमृतसर आणि तरन गावातून हे ड्रोन अनेकदा नियंत्रित केल्याचं तपासात उघड झालं आहे.