नवी दिल्ली : बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्ये भूकंपाच्या धक्क्याने हादरले. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ५.४ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचे धक्के बिहार, पश्चिम बंगालसह आसाम आणि सिक्कीममध्येही जाणवले. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक घाबरू घराबाहेर पडले.
या भूकंपाचे केंद्र हे सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून २५ किमी अंतरावर भारत-भूतान सीमेवर होतं. भूकंपाचे धक्के हे रात्री ८ वाजून ४९ मिनिटांनी जाणवले. त्याआधी सोमवारी दिवसा हिमाचल प्रदेशच्या चंबा आणि लाहौल स्पितीमध्ये भूकंप झाला होता. भूकंपाच्या धक्क्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: संबंधि राज्यांच्या मुख्यमंर्त्यांसोबत बैठक घेऊन भूकंपनाने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पंतप्रधान मोदी यांनी बिहार, आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंर्त्यांशी संवाद साधला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बिहारमधील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिका-यांना सूचना दिल्या. आपल्या भागांमध्ये कुठली हानी झाली आहे का? याचा आढावा घेण्यास त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी नितीशकुमार यांना फोन करून स्थितीची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.