22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयखाद्यतेलाच्या किमतीमध्ये सणासुदीदरम्यान दिलासा?

खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सणासुदीदरम्यान दिलासा?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : खाद्यतेलाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अर्थात, दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून राज्य, एफसीआयसह सर्व संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी दिली. दरम्यान, तेलाच्या किमती नियंत्रणात राहाव्यात, यासाठी २५ ऑक्टोबर रोजी राज्यांसोबत चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दर आठवड्याला आंतर-मंत्रालयीन समितीच्या बैठका घेऊन किंमतींवर नियंत्रण आणि देखरेख करण्यासाठी सातत्याने पावले उचलली जात आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारांनीही पावले उचलावीत, अशा सूचना दिल्या आहेत. मोहरीच्या तेलाचे उत्पादन दहा लाख मेट्रिक टनांनी वाढले आहे, पण आंतरराष्ट्रीय बाजारात इतर तेलांच्या किमती वाढल्यामुळे त्याची किंमतदेखील वाढली. खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी अलीकडच्या काळात सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

पाम तेलावरील आयात शुल्क शून्य टक्के करण्यात आले आहे. कृषी उपकर ७.५ टक्के करण्यात आला आहे. तो १४ ऑक्टोबर ते मार्च २०२२ पर्यंत लागू राहील. या दरम्यान कच्चे सूर्यफूल तेल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्कदेखील कमी करण्यात आले आहे. कृषी उपकर ५ टक्के असेल. रिफाइन्ड पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क १७.५ टक्के करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

कांद्याच्या दराबाबत पांडे म्हणाले की, कांद्याचे दर नियंत्रणात आहेत. त्याच्या किमतीत फारशी वाढ झालेली नाही. सध्या परिस्थिती सामान्य आहे. कांद्याच्या निर्यातीवर कोणतेही निर्बंध येण्याची शक्यता नाही. केंद्र राज्यांना २६ रुपये प्रति किलो दराने कांदा पुरवत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या