नवी दिल्ली : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या COVID-19वर लस शोधण्यासाठी सर्व जग प्रयत्न करत आहे. सर्व देशांमधले तज्ज्ञ डॉक्टर्स, औषध निर्माण क्षेत्रातल्या कंपन्या अहोरात्र प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये भारतही आघाडीवर असून यात 7 कंपन्यांनी मोठा पल्ला गाठला आहे. यातल्या बायोटेकच्या लशीची मानवी चाचणीसुद्धा सुरु झाली आहे. तर इतर काही कंपन्याही क्लिनिकल चाचण्यांसाठी तयार आहेत. यात यश मिळालं तर 130 कोटींच्या आपल्या देशाला आणि सर्व जगालाच त्याचा फायदा होणार आहे.
कोरोना व्हायरसने जगभरातल्या 1.4 कोटी लोकांना बाधित केलं आहे. दररोज त्याचं संक्रमण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय कंपन्यांमध्ये भारत बायोटेक (Bharat Biotech), सीरम इंस्टिट्यूट (Serum Institute), झायडस कॅडिला (Zydus Cadila), पॅनासिया बायोटेक (Panacea Biotec), इंडियन इम्युनॉलॉजिकल्स (Indian Immunologicals), मायनवॅक्स (Mynvax) आणि बॉयलॉजिकल ई (Biological E) या दिग्गज औषध निर्माण कंपन्यांचा समावेश आहे.
भारतीय कंपन्यांच्या या संशोधनाची जगानेही दखल घेतली आहे. तर अनेक कंपन्यांचं या संशोधनावर लक्ष आहे. भारतच जगाला कोरोनावरच्या औषधाचा पुरवढा करू शकतो असं मत बिल गेट्स यांनीही व्यक्त केलं होतं. सीरम इन्स्टिट्यूटचंही त्यांनी कौतुक केलं होतं. त्यामुळे सर्व जगाच्या नजरा आता भारतीय कंपन्यांकडे लागल्या आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांनी आज सर्व रेकॉर्ड मोडले. देशात पहिल्यांदाच 24 तासांत तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण सापडले. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 10 लाख 77 हजार 618 झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 543 रुग्णांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 26 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर, 6 लाख 77 हजार 422 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 10.86 टक्के आहे. तर, रिकव्हरी रेट हा 65.24% झाला आहे.
Read More कोरोनाचे ६६ रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू