मुंबई: सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे म्हणतात. पण निवडणुकीचे विघ्न पार पाडण्यासाठी सत्ताधाऱ्यांना काळजी घ्यावीच लागते. त्याचाच प्रत्यय भारतीय जनतेला सध्या येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहे.मात्र सध्या देशात त्याचा प्रभाव दिसत नसल्याने केंYद्र सरकारने पाच राज्यांत पराभवाच्या भीतीने ही संभाव्य दरवाढ रोखल्याचे जाणकारांचे मत आहे.
आठ वर्षांपूर्वी असलेले सर्वाधिक दर सध्या प्रति बॅरल मोजावे लागत आहे. तरीपण भारतीयांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून इंधन दरवाढीचा सामना करावा लागत नाही. देशात पाच राज्यात इलेक्शन लागल्याने त्याचा थेट परिणाम इंधन दरवाढ रोखण्यावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींनी २०१४ नंतर पहिल्यांदा प्रति बॅरल ८७ डॉलर ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. असे असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग ७४ व्या दिवशीही कायम आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे मानक ब्रेंट क्रूड मंगळवारी ८७.७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. जागतिक पातळीवरील वाढता भू-राजकीय तणाव आणि पुरवठ्यातील अडथळे यामुळे ही दरवाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय मतभेद आणि बंडखोरांचे संकट यामुळे तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. येमेनच्या हुती बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातीमधील तेल केंद्रावर हल्ला करून पुरवठा खंडित केला आहे. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील दोन शेजारी देश इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाचा पुरवठा आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जागतिक तेलाचे साठेही कमी होत आहेत, त्याचा ही परिणाम दिसून येत आहे. डिसेंबर २०२१ च्या अखेरीस कच्चे तेल प्रति बॅरल ६८.८७ च्या स्तरावर आले.तर, नवीन वर्ष सुरू होताच, ब्रेंट क्रूडच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आणि आता तेल प्रति बॅरल ८७.७ डॉलर्सवर पोहोचले आहेत. २०१४ नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे.
दिवाळीनंतर दरवाढ नाही
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असतानाही देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होताना दिसत नाही. जवळपास अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुYपये प्रतिलिटर, तर डिझेल ८६.६७ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राज्य सरकारांनी त्यांच्या स्तरावर मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केली. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आटोक्यात आले. ऑक्टोबर अखेर पेट्रोलने ११० रुपये, तर डिझेलने ९८ रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र त्यानंतर दरवाढ झालेली नाही. पाच राज्यांतील निवडणुकांमुळेच ही दरवाढ रोखल्याची चर्चा आहे.