कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. त्याची केंद्र सरकारने तातडीने दखल घेत केवळ २४ तासांत ही मुदतवाढ दिल्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला.
देशभरात यंदा विक्रमी साखर उत्पादन झाले. आगामी गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तातडीने साखर निर्यातीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाडिक यांनी केली होती.
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. या संदर्भातील चर्चेत महाडिक यांनी साखर उद्योग समोरील अडचणी मांडल्या.
विशेषत: साखरेचे बंपर उत्पादन झाल्याच्या पार्श्वभूमीवर निर्यात आणि स्थानिक बाजारातील दर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची गरज, कोरोना संकट आणि देशांतर्गत बाजारातील गरज ओळखून केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांचा फेरविचार, साखर कारखान्यांकडे दीर्घकाळ साखर पडून राहिल्यास साखरेचा दर्जा खालावण्याचा धोका असे मुद्दे मांडले होते.