नवी दिल्ली : आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक कागदपत्रांपैकी एक असून, कोणत्याही प्रकारच्या सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी हे अनिवार्य कागदपत्रांपैकी एक आहे. मात्र, डुप्लिकेट आधार किंवा बनावट आधार कार्डशी संबंधित अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ही बाब लक्षात घेता वकऊअक ने बनावट आणि डुप्लिकेट आधार कार्डची ओळख पटवून ते रद्द करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईअंतर्गत यूआयडीने आतापर्यंत ५९८,९९९ पेक्षा जास्त डुप्लिकेट आधार कार्ड रद्द केले आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत डुप्लिकेट आधार कार्ड रद्द केल्याची माहिती दिली. सरकारने डुप्लिकेट आधारच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तसेच आधारकार्डमध्ये एक अतिरिक्त पडताळणी फिचर जोडण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच आधार पडताळणीसाठी चेह-यावरून व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. सध्या व्हेरिफीकेशनसाठी फक्त फिंगरप्रिंट आणि बुबुळाच्या मदत घेतली जात आहे.
आधारशी संबंधित सेवा देणा-या बेकायदेशीर वेबसाइट्सवरील दुस-या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रशेखर म्हणाले की यूआयडीने या वेबसाइट्सना नोटिसाही पाठवल्या आहेत. तसेच संबंधित वेबसाइट्सच्या मालकांना अशा प्रकारच्या अनधिकृत सेवा देणे बंद करण्यास सांगितले आहे. तसेच सेवा प्रदात्यांनादेखील अवैध वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले आहे.
११ बनावट आधार तयार करणा-या कंपन्या बॅन
जानेवारी २०२२ पासून बनावट आधार कार्डची निर्मिती करणा-या ११ कंपन्या बॅन करण्यात आल्या आहेत. त्यानुासर या वेबसाइट्सना रहिवासासंबंधी नावनोंदणी करण्याचे आणि बायोमेट्रिक माहितीमध्ये बदल करण्याचे किंवा मोबाइल नंबर सध्याच्या आधारशी लिंक करण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही. त्यामुळे मोबाईल नंबर पत्ता आणि फोटोपर्यंत सर्व तपशील अपडेट करण्यासाठी नागरिकांनी यूआयडीच्या अधिकृत वेबसाइट तसेच अधिकृत आधार केंद्रांना भेट द्यावी असे आवाहन राजीव चंद्रशेखर यांनी नागरिकांना केले आहे.