नवी दिल्ली : देशात गव्हाचे उत्पादन समाधानकारक झाले असून केंद्र सरकारने मात्र गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. या निर्यात बंदीमुळे देशातील शेतकरी संकटात सापडला आहे. उत्पादन भरपूर झाले असल्याने गव्हाचे दर घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान भारताचा गहू रुबेला व्हायरसच्या नावाखाली तुर्कीनेही नाकारल्याने गहू पुन्हा माघारी आणावा लागल्याने शेतक-यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
भारताने गव्हाची निर्यात बंदी केल्यावर देशासह जगातील सर्वच देशांनी निर्यात बंदी बाबत भाष्य केले. भारताने घातलेली निर्यात बंदी तुर्तास उठवावी असे अनेक देशांनी भारताला सांगितले. परंतु भारतात होणा-या गव्हाचे उत्पादन आणि भविष्याचा विचार करून ही निर्यात बंदी तशीच राहिल असे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान दुसरीकडे तुर्कस्तानने भारताने दिलेला गहू खराब असल्याचे सांगून परत केला आहे. तसेच गव्हावर रुबेला व्हायरस असल्याचे तुर्कस्तानकडून सांगण्यात आले आहे. २९ मेपासून ५६ हजार ८७७ टन भारतीय गहू भरलेली जहाजे तुर्कस्तानातून गुजरातच्या बंदरांवर परत आणली जात आहेत. गव्हात रुबेला विषाणू आढळल्याचे तुर्कस्तानने म्हटले आहे. त्यामुळे ते परत पाठवत असल्याचे सांगण्यात आले.
निर्यात बंदी उठवून चालना द्यावी
देशातील गव्हाच्या निर्यातबंदीवर यापूर्वीच अनेक विरोधी नेत्यांनी गव्हावरील निर्यात बंदी उठवून शेतक-यांना चालना द्यावी असे सांगितले होते. आधीच शेतकरी संकटात असताना तुर्कस्तानकडून पाठवण्यात आलेला गव्हाचा बोजा आल्याने शेतक-यांच्या नव्याने उत्पादन केलेल्या गव्हाच्या दरात घसरण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गव्हाच्या किमती कमी होण्याची शक्यता?
युक्रेन-रशिया यांच्यातील महायुद्धामुळे भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. यामुळे भारताला निर्यातीवर बंदी घालावी लागली. भारतीय गव्हात रुबेला विषाणू असल्याचे आरोप चिंताजनक असू शकतात. रुबेलाच्या चिंतेमुळे तुर्कस्तानने भारतीय गहू परत केल्याने आंतरराष्ट्रीय मागणीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे देशात आणि परदेशात गव्हाच्या किमती खाली येऊ शकतात.