अंबाला : आंदोलन करणा-या शेतक-यांनी दुसरीकडे जाऊन मरावे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजी शेतक-यांची निंदा केल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणा-या शेतक-यांनी घेतली आहे. सलग सहाव्या दिवशी शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणामधील शेतक-यांचा या कृषी कायद्यांना विरोध आहे.
पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी हजारोंच्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. मात्र याच आंदोलनासंदर्भात बोलताना हरयाणामधील अंबाला येथे रेल्वे पूलाचे भूमिपुजन करण्यासाठी आलेले केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतक-यांकडून होणा-या विरोधाला संतापून कटारिया यांनी जर शेतक-यांना विरोधच करायचा आहे आणि काळे झेंडेच दाखवायचे आहेत तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे, असे कटारिया यांनी म्हटले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कटारिया हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले असता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. शेतक-यांनी मोदी सरकार आणि कटारिया यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.
शेतक-यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन विरोध करण्यास सुरुवात केल्यानंतर कटारिया संतापले. त्यानंतर त्यांनी, आपले अंबालामध्ये सात ते आठ कार्यक्रम आहेत. त्यामुळे शेतक-यांना विरोधच करायचा असेल तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे असे वक्तव्य केल्याचे एका वाहिनीने दिले आहे़ पुढे बोलताना त्यांनी, काळे झेंडे दाखवणा-यांना देव सद्बुद्धि देवो अशी मी हात जोडून प्रार्थना करतो असेही म्हटले आहे़ नवे कृषीकायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे आंदोलक शेतक-यांनी सांगितले.
कटारियांची ५ वर्षांनंतर सदर परिसराला भेट
कटारिया हे मागील पाच वर्षांपासून या भागामध्ये आले नव्हते. आज कटारिया येथे आल्यानंतर शेतक-यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा विरोध केल्याने ते चांगलेच संतापले.
आंदोलनामागे विदेशी हात : कृषीमंत्री जे. पी. दलाल
दुसरीकडे शेतकरी आंदोलनाच्या मागे परदेशातील शक्तींचा हात असल्याचे वक्तव्य हरयाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी केले आहे. काही परदेशी शक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आवडत नाही. त्यामुळेच ते शेतक-यांना पुढे करुन मोदींच्या कामात अडथळा निर्माण करत असल्याचा दावा दलाल यांनी केला आहे.
देशात २०२१ मध्ये ५ जी नेटवर्क कनेक्शन