बंगळूरू : कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले की, काँग्रेसने निवडणुकीदरम्यान दिलेली पाच आश्वासने या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. शुक्रवार दि. २ जून रोजी रोजी कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले आहे की निवडणुकीच्या आधी आणि त्यादरम्यान आम्ही पाच आश्वासन जनतेला दिली होती.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि मी आश्वासन पत्रांवर सही देखील केली होती आणि ही सगळी आश्वासने पूर्ण करून त्यांनी लोकांपर्यंत पोहचवण्याचा विश्वास देखील आम्ही दिला होता. तेव्हा आम्ही या आश्वासन पत्रांचे वाटप देखील केले होते. काँग्रेसचा मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यांनंतर खातेवाटप देखील करण्यात आले होते. त्यामुळे आता कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.
पाच आश्वासने
– प्रत्येक घरात २०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा करण्यात येईल. (गृह ज्योति योजना)
– प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. (गृह लक्ष्मी योजना)
– दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा १० किलो मोफत तांदूळ (अन्न भाग्य योजना)
– दोन वर्षांपासून १८ ते २५ वर्षांतील पदवीधर प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा तीन हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा १५०० रुपये देण्यात येणार (युवा निधी योजना)
– सार्वजनिक बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा (शक्ती योजना)
कधी सुरुवात होणार?
मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले की अन्न भाग्य योजनेअंतर्गत १ जुलैपासून दारिद्रय रेषे खालील सर्व शिधापत्रिका धारकांना दहा किलो तांदूळ मोफत देण्यात येतील. तसेच गृहलक्ष्मी योजना ही १५ ऑगस्टपासून सुरु करण्यात येईल असे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले. कोणत्याही जाती-धर्माचा भेदभाव न करता या पाच निर्णयांना अमलात आणण्यात यावे असे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी मंत्रिमंडळ बैठकीत म्हणाले आहेत. शक्ती योजनेअंतर्गत एक जून पासून सर्व महिलांना कर्नाटकातील सार्वजनिक बसमधून मोफत प्रवास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.