नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व खाजगी दूरचित्रवाणी प्रसारकांना ऑनलाईन गेमिंग, काल्पनिक खेळांसंदर्भात जाहिरातींसाठी ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्डस काउन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. कायद्याद्वारे प्रतिबंधित कोणत्याही उपक्रमाला जाहिरातीत प्रोत्साहन दिले जाऊ नये अशी सूचना मंत्रालयाने केली आहे.
ऑनलाईन गेमिंग, काल्पनिक खेळ इत्यादीबाबत दूरचित्रवाणीवर मोठ्या संख्येने जाहिराती दिसून येत असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आढळून आले आहे. अशा जाहिराती दिशाभूल करणा-या असल्याचे आढळून आले असून त्यात ग्राहकांना त्यासंबंधित आर्थिक आणि इतर धोक्यांची योग्य माहिती दिली जात नाही. तसेच केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा १९९५ आणि ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत निहित जाहिराती संहितेचे काटेकोरपणे पालन केले नसल्याचे आढळून आले आहे. , असे निरीक्षण मार्गदर्शक सूचनेत नोंदविले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ग्राहक व्यवहार मंत्रालय, एएससीआय, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन, इंडियन ब्रॉडकास्ंिटग फाउंडेशन, ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन, फेडरेशन ऑफ इंडियन फँटेसी स्पोर्ट्स, आणि ऑनलाईन रम्मी फेडरेशन यांच्या अधिकारी आणि प्रतिनिधींशी सल्लामसलत केल्यानंतर ही सूचना जारी केली आहे.
डिस्क्लेमर असणे आवश्यक
एएससीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रत्येक गेमिंग जाहिरातीमध्ये या गेममध्ये आर्थिक जोखीम असते आणि ते व्यसन असू शकते. कृपया जबाबदारीने आणि स्वत:च्या जोखमीवर खेळा ,असे नमूद करणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच हे डिस्क्लेमर जाहिरातीच्या किमान २० टक्के जागेत असायला हवे, पण त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येते, असे मंत्रालयाने म्हटले आहे. ऑनलाइन गेमिंगमध्ये रोजगाराचा पर्याय म्हणून उत्पन्नाची संधी मिळू शकते किंवा असे गेम खेळणारी व्यक्ती इतरांपेक्षा यशस्वी असल्याचे जाहिरातीत दाखवू नये, असेही म्हटले आहे.
अदर पुनावाला यांना एशियन ऑफ द इअर