बडोदा : अमूल या १९४६ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दूध सहकारी संस्थेची सत्ता हस्तगत करण्यात भाजपला यश आले आहे. अमूलच्या संचालक मंडळात ११ पैकी नऊ संचालक काँग्रेसचे होते. त्यापैकी सात जणांनी वेगवेगळय वेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसने ‘अमूल’ची सत्ता गमावली आहे.
गुजरातमध्ये १८ दूध सहकारी संस्था आहेत. त्यापैकी केवळ अमूलमध्ये आता काँग्रेसचे दोन सदस्य उरले आहेत. उरलेल्या सहकारी संस्थांमध्ये सर्व सदस्य भाजपचेच आहेत. गेल्या वर्षांच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने अमूलवर लक्ष केंद्रित केले आणि काँग्रेसच्या पाच सदस्यांना आपल्या बाजूने वळवले. अमूलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह परमार यांनी या वर्षांच्या सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश केला, तर गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या जोवासिंह चौहान (मोदाज), सीता चंदू परमार (तारापूर), शारदा हरी पटेल (कापडवंज) आणि घेला मनीष झाला (काथलाल) या चार संचालकांनी गेल्या आठवड्यात प्रवेश केल्यामुळे भाजपचे पारडे जड झाले.
भाजपचे दोन जिल्ह्यांत वर्चस्व
गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी आणंद आणि खेडा या दोन जिल्ह्यांमध्ये वर्चस्व असल्यामुळे अमूलच्या संचालक मंडळामध्ये काँग्रेसचे बहुमत होते. आणंद आणि खेडामधील ग्राम सहकारी संस्थांमध्ये सात लाख दूध उत्पादक आहेत. गेल्या काही वर्षांत काँग्रेसने १५ दूध सहकारी संस्थांमधील सत्ता गमावली आहे.