पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जदयूमध्ये प्रवेश करणा-या बिहारच्या माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची निराशा झाली. पांडे यांना जदयूने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने दुसराच उमेदवार घोषित केल्याने पांडे यांची निराशा झाली.
गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपाने तिथे एका बिहारच्या निवृत्त पोलिस हवालदाराला उमेदवारी दिली आहे. बक्सरमधील भाजपाचे उमेदवार परशुराम चतुर्वेदी यांनी माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना मागे टाकत ही उमेदवारी मिळवली आहे अशी चर्चा सुरू आहे. गुप्तेश्वर पांडे हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांच्या आदरपूर्वक पाया पडतो आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात आपुलकीशिवाय काहीच नाही, असे चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी भाजपाचे आभार देखील मानले.