नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी सामान्यांकडून करण्यात येत आहे. तर विरोधक देखील आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीसाठी आधीचे सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंधन दरवाढ एक गंभीर मुद्दा आहे, ज्यामध्ये किंमत कमी करण्याव्यतिरिक्त कोणतचं उत्तर देणे योग्य नाही. केंद्र आणि राज्यांनी दोन्ही पातळींवर ग्राहकांसाठी इंधन दरांमध्ये कमतरता आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे निर्मला सीतारामण यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, ओपीईसी देशांनी उत्पादनाचे जे अनुमान लावले होते, तेदेखील खाली येण्याची शक्यता आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. तेलाच्या किंमतींवर सरकारचे नियंत्रण नाही, ते तांत्रिकदृष्ट्या मुक्त करण्यात आले आहे. तेल कंपन्या कच्चे तेल आयात करतात, रिफाइन करतात आणि विकतात, असेही त्यांनी सांगितले.
देशात मागील काही दिवसांपासून सतत इंधन दरवाढ होत आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर मुंबईत ९७ रुपये प्रतिलिटरवर पेट्रोल दर पोहोचले आहे. यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही प्रमाणात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
ज्या दिवशी इंधनदरवाढ नाही तो ‘अच्छा दिन’