25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home राष्ट्रीय भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांचं आज निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती कालपासून अधिकच ढासळली होती

10 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतल्या लष्कराच्या आर अॅंड आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती कालपासून अधिकच ढासळली होती. फुफ्फुसातील संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे आज सकाळी लष्करी रुग्णालयाने सांगितलं होते.

काही काळ व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं

प्रणव मुखर्जी यांना काही काळ व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. पण त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.. त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता

भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम होता. 5 दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात, अनेक उच्च पदांवर असूनही ते नेहमीच जमिनीशी जोडले गेले. त्यांच्या सभ्य आणि मनमिळावू स्वभावामुळे ते राजकीय क्षेत्रात लोकप्रिय होते. प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द
भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.

कळंब च्या कू. पौर्णिमा मोहिते यांची चित्रातून वेगळी ओळख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या