18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रकिल्ले शिवनेरी शिवभक्त व पर्यटकांसाठी खुला

किल्ले शिवनेरी शिवभक्त व पर्यटकांसाठी खुला

एकमत ऑनलाईन

जुन्नर : पुण्याचे जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाची स्मारके खुली करण्याचा आदेश दिला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार आजपासून (शुक्रवार) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी शिवभक्त व पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

दुस-या लॉकडाऊनपासून किल्ले शिवनेरीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही किल्यावर जाण्यासाठी मात्र बंदी कायम होती, परिणामी अनेक शिवभक्त व पर्यटकांना किल्ल्याच्या पायथ्यापासूनच दर्शनावाचून परतावे लागत होते. त्यामुळे शिवभक्तांमध्ये काहीसा नाराजीचा सूर होता. आजच्या जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाने शिवभक्त व पर्यटकांना किल्ले शिवनेरी वरील शिवजन्मस्थानाचे दर्शन घेता येणार आहे. आज पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीचे प्रवेशद्वार उघडल्यानंतर विविध ठिकाणाहून आलेल्या सुमारे ४०० ते ४५० शिवभक्त व पर्यटकांनी शिवनेरीला भेट दिली असल्याची माहिती जुन्नर चे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी पुरातत्व खात्यावर असून या ठिकाणी शारिरीक अंतर बाळगणे, मास्कचा तसेच सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. शिवनेरी पर्यटक व शिवभक्तांसाठी खुला झाला असला तरी गडावरील शिवाई मातेचे मंदिर मात्र बंद राहणार आहे. मंदिरे खुली करण्याचा आदेश नसल्याने गडावरील शिवाई मातेचे दर्शन घेता येणार नाही.

दरम्यान किल्ले शिवनेरी शिवभक्त आणि पर्यटकांसाठी खुला करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे शिवभक्तांकडून स्वागत करण्यात आले. गड संवर्धनाचे कार्य करत असताना अनेक पर्यटक तसेच शिवभक्तांकडून किल्ले शिवनेरी प्रवेशसंदर्भात विचारणा होत असल्याचे जुन्नरचे इतिहास अभ्यासक व गडकिल्ले संवर्धन करणा-या शिवाजी ट्रेल या संस्थेचे प्रा.विनायक खोत यांनी सांगितले. आजच्या जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाने गडकिल्ले पुन्हा एकदा स्वराज्यात आले या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या