23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयआजपासून सुटी दिवशीही बँकिंग व्यवहार शक्य

आजपासून सुटी दिवशीही बँकिंग व्यवहार शक्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : १ ऑगस्टपासून देशात अनेक बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर आणि जगण्यावरही होणार आहे. अर्थात, नव्या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला अधिक झळ बसण्याचीच अधिक शक्यता आहे. अर्थात, उद्यापासून बँकेतून करण्यात येणारे व्यवहार, एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणारे शुल्क यासह इतर व्यवस्थांमध्ये बदल होणार आहेत. दिलासादायक बाब म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस प्रणाली ७ दिवस कार्यरत ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून (१ ऑगस्ट) सुटी दिवशीही बँकिंग व्यवहार करता येणार आहेत. याचा ग्राहकांना फायदा होऊ शकतो.

१ ऑगस्टपासून रविवार आणि सुटीच्या दिवशीही बँकेतून व्यवहार करता येणार आहेत. आरबीआयने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस प्रणाली ७ दिवस कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या पगारासाठी किंवा पेन्शनसाठी शनिवार आणि रविवार जाण्याची वाट पाहावी लागणार नाही. याशिवाय सुटीच्या दिवशी तुमच्या खात्यातून हप्ताही कापला जाणार आहे. म्हणजेच १ ऑगस्टपासून तुम्हाला यापुढे पगार, पेन्शन आणि ईएमआय पेमेंटसारख्या महत्त्वाच्या व्यवहारासाठी कामाच्या दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी पैसे काढणे, जमा करणे आणि चेक बुक शुल्कासह अनेक नियम बदलणार आहेत. तुम्ही बँकेच्या शाखेत चेकद्वारे फक्त ४ वेळा मोफत रोख व्यवहार करू शकाल. चारपेक्षा जास्त ठेवी किंवा पैसे काढण्यासाठी प्रत्येक वेळी १५० रुपये शुल्क भरावे लागेल. १ ऑगस्टपासून एटीएमद्वारे तुम्ही ६ महानगरांमध्ये महिन्यातून ३ वेळा मोफत व्यवहार करू शकता. याशिवाय इतर शहरांमध्ये ५ व्यवहार मोफत आहेत. यावर व्यवहारासाठी शुल्क आकारले जाईल. शुल्क म्हणून तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर मेट्रो शहरांमध्ये २० रुपये आणि इतर शहरांमध्ये ८.५० रुपये भरावे लागतील.

ऑगस्ट महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किमती बदलू शकतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकार एलपीजी सिलेंडरच्या नवीन किमतीची घोषणा करते. गेल्या महिन्यात सरकारने १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत २५.५० रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे ग्राहकांना चांगलीच झळ बसली होती. अगोदरच पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि खाद्य तेलाचे वाढलेले भाव लक्षात घेता गृहिणींचे बजेटच कोलमडून गेले आहे. त्यात १ ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरच्या किमती आणखी वाढल्यास नागरिकांमधून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या गॅस सिलेंडरच्या बदलणा-या किमतीकडे ग्राहकांचे लक्ष असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

एटीएम इंटरचेंज शुल्कात केली वाढ
१ ऑगस्टपासून एटीएम इंटरचेंज फी १५ रुपयांवरून १७ रुपये केली जाईल, तर गैरआर्थिक व्यवहारांवरदेखील शुल्क ५ रुपयांवरून ६ रुपये केले जाणार आहे. बँकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी सर्वत्र एटीएम लावले आहेत. इतर बँकांचे ग्राहकही या मशीनमधून पैसे काढतात किंवा हस्तांतरित करतात. प्रत्येक बँकेने मोफत व्यवहाराची मर्यादा निश्चित केली आहे. त्यापेक्षा जास्त व्यवहारासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते. याला इंटरचेंज फी म्हणतात.

डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी आता शुल्क
१ ऑगस्टपासून इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी फी भरावी लागेल. आता प्रत्येक वेळी डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी २० रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. आतापर्यंत डोअर स्टेप बँकिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.

मनी ट्रान्स्फरसाठीही शुल्क आकारणार
या व्यतिरिक्त, ग्राहकाला मनी ट्रान्सफर आणि मोबाईल पेमेंट इत्यादीसाठी २० रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. आयपीपीबी खाते किंवा इतर कोणत्याही बँकेच्या ग्राहक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी समान शुल्क भरावे लागेल.

लिंबगावात प्लास्टिकचे तांदूळ आढळले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या