नवी दिल्ली : जम्मू – राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौ-यावर आहेत. त्यांच्या सोबत जी-२३ चेही अनेक नेते उपस्थित आहेत. जम्मूमध्ये शनिवारी रॅलीदरम्यान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीहून आलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपील सिब्बल म्हणाले, काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे आणि आपल्याला याला बळकट करण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट आपल्याला स्वीकारायला हवी. यावेळी कपील सिब्बल यांनी विमानाचे उदाहरण दिले. जेव्हा आपण विमानाने जातो, तेव्हा पायलट सोबत एका इंजिनिअरचीही आवश्यकता असते. असा इंजिनिअर ज्याला या तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती असेल. गुलाम नबी आझाद काँग्रेससाठी याच भूमिकेत आहेत. त्यांना देशातील सर्वच राज्यांमधील तळागाळातील परिस्थितीची जाण आहे.
काँग्रेसला नबींच्या मार्गदर्शनाची आवश्यकता
काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले, आझाद एक एकनिष्ठ काँग्रेस नेते आहेत. जे नेते काँग्रेसला चांगल्या पद्धतीने समजतात त्यांपैकी एक आझाद आहेत. काँग्रेस आणि देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यावेळी भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, एखाद्या राज्याला तोडून दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले, असे यापूर्वी कधीही झाले नाही. जम्मू काश्मीरचे तुकडे केले आणि आपण यासाठी लढत राहिलो.
जी-२३ नव्हे, गांधी-२३ :राज बब्बर
काँग्रेस नेते राजबब्बर म्हणाले, आपल्याला जी-२३ म्हटले जाते. मात्र, आपण गांधी -२३ आहोत. काँग्रेस बलशाली व्हावी, अशी गांधी-२३ ची इच्छा आहे. पक्षाच्या आदर्शांमुळेच गुलाम नबी मोठे झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्या निवृत्तीवर भावूक झाले होते.
अठरा तासांत तब्बल २५.२४ किलोमीटरचा महामार्ग; ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव