नवी दिल्ली : दिल्लीतील तिहार जेलमध्ये मंगळवारी झालेल्या गँगवॉरमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या करण्यात आली. रोहिणी कोर्टात केलेल्या गोळीबाराचा टिल्लू आरोपी होता. योगेश टुंडा आणि त्याच्या गँॅगमधील लोकांनी त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यांना दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या महिन्यात तिहार जेलमध्ये दुसरा गुंड मारला गेला आहे.
दिल्ली पोलिसांतील अतिरिक्त डीसीपी अक्षत कौशल यांनी सांगितले की, आज सकाळी ७ वाजता डीडीयू रुग्णालयातून दोन जखमी लोकांची माहिती मिळाली, ज्यांना तिहार तुरुंगातून रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यापैकी एक सुनील ऊर्फ टिल्लू याला बेशुद्धावस्थेत आणण्यात आले. नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. तर, रोहितवर उपचार सुरू असून तो धोक्याबाहेर आहे.
कोण होता टिल्लू ताजपुरिया?
गँगस्टर टिल्लू ताजपुरिया हा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी होता. तो श्रद्धानंद कॉलेजमधून उत्तीर्ण झाला होता. जितेंद्र गोगी यांच्याशी त्यांची मैत्री कॉलेजच्या काळात प्रसिद्ध होती. दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत दोघांनीही थेट निवडणूक लढवली नाही, परंतु दोघेही आपले स्वतंत्र पॅनल स्थापन करून उमेदवार उभे करायचे.