22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयगॅसदर वाढ ही जनतेची लूट

गॅसदर वाढ ही जनतेची लूट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर केंद्रसरकारने आता गॅसच्या दरातही वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. ही जनतेची लूट असून केवळ दोन लोकांचा विकास असल्याचा टोला त्यांनी मोदी सरकारला हाणला आहे. दरम्यान काँग्रेस पक्षानेही गॅसदरवाढीवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी ही गॅसदरवाढ निर्दयी व अनैतिक असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. निर्दयी मोदी सरकारने केवळ शेतक-यांचेच जीणे खराब केलेले नसून सर्वसामान्यांचेही जगणे मुश्किल करुन टाकले आहे.

पेट्रोल, डिझेल व गॅसदरवाढीमुळे श्रीमंतांबरोबरच गरीबांच्याही खिशाला फटका बसत आहे. मात्र या सरकारला त्याची काहीही चाड नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रसरकारने ही दरवाढ तसेच पेट्रोल व डिझेलवर वाढवलेली एक्साईज ड्युटी त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणीही श्रीनाते यांनी केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते आय.पी. सिंह यांनीही गॅसदरवाढीवरुन मोदी सरकारवर टीका केली. अच्छे दिनचे स्वप्न दाखवित हे सरकार सत्तेत आले. मात्र अच्छे दिन तर आलेच नाही. उलट सातत्याने इंधन व गॅसदरवाढ सर्वसामान्यांच्या माथी मारण्यात येत आहे. तुमचे अच्छे दिन नको मात्र जुने दिवस आम्हाला परत द्या , असा टोलाही सिंह यांनी हाणला. एवढी दरवाढ करुनही या व्यापा-याला सर्व काही विकून टाकायचे आहे, असा प्रहारही केला.

मंगळवारपासून गॅस सिंलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेटच कोलमडले आहे. मुंबईत गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. याआधी एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा भाव ७८९.५० रुपयांपर्यंत वाढला होता. त्यावेळी सिलिंडर आठशे रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती.मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.

विनाअनुदानित गॅसग्राहकांना मोठा फटका
देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात. तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनी किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनिमय यानुसार कंपन्या किरकोळ विक्रीसाठी इंधन दर निश्चित करतात. गॅस दरवाढीचा फटका विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणा-यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. अनुदानित गॅस सिलिंडर धारकांना मिळणारी सबसिडीसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे.

अडीच महिन्यात चौथ्यांदा वाढ
गॅस सिलिंडरच्या किंमतीत डिसेंबरपासून वाढ होत आहे. १ डिसेंबर २०२० रोजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर पंधरा दिवसातच १६ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा सिलिंडर ५० रुपयांनी महागले. त्यानंतर ४ फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली. आता पुन्हा १६ फेब्रुवारीपासून सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे.

चिनी दूतावासासमोर नागरिकांचे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या