जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या राजस्थान प्रवेशापुर्वीच दोघांची मने जुळली असल्याचे पाहावयास मिळाले आहे.
अशोक गेहलोत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पायलटला देशद्रोही म्हटले होते. गेहलोत यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले की, अशाप्रकारे चिखलफेक करण्यापेक्षा सर्वांनी मिळून काँग्रेसला मजबूत केले पाहिजे. पलटवारांच्या दरम्यान काँग्रेसचे दोन्ही दिग्गज नेते एकत्र दिसले. निमित्त होते राजस्थानची राजधानी जयपूर येथील पत्रकार परिषदेचे. येथे दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेची तयारी करण्यात आली. यावेळी अशोक गेहलोत म्हणाले, राहुलजी ज्या रुपात प्रवासाला निघाले आहेत, त्यामुळे संपूर्ण देशात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.
येत्या काही दिवसांत ही यात्रा संपणार आहे, पण देशात निर्माण झालेले आव्हान, तणाव आणि ंिहसाचाराचे वातावरण याबाबत राहुलजींनी मांडलेला मुद्दा संपूर्ण देशाने स्वीकारला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरातमध्ये ज्या प्रकारे फिरत आहेत, तिथे यात्रा का होत आहेत? राहुल गांधींच्या भेटीचा संदेश मोठा असल्याने ते इतके घाबरलेले आणि अस्वस्थ का आहेत, हे तुम्ही समजू शकता. त्याचवेळी सचिन पायलट म्हणाले, राहुल गांधींची राजस्थानमध्ये होणारी भारत जोडो यात्रा खूप संस्मरणीय असेल, ही एक ऐतिहासिक यात्रा असेल, या यात्रेत सर्व स्तरातील लोक सामील होतील. या यात्रेत कार्यकर्ते आणि नेतेही सामील होणार आहेत.