नवी दिल्ली : या आठवड्यात उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे दोन दिवस नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र, मंगळवारी दुपारपासूनच उन्हाने नागरिकांची अवस्था दयनीय केली. अशा स्थितीत पुढच्या आठवड्यात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र, पुढील आठवड्यातही उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. आयएमडीने या संदर्भात चेतावणी जारी केली आहे. जी विशेषत: पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि किनारी आंध्र प्रदेश आणि बनमसह काही भागांसाठी आहे.
दिल्लीत शनिवारी(ता.४) सकाळी किमान तापमान २८.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जे सामान्यापेक्षा एक अंश सेल्सिअस जास्त आहे. आयएमडीने काही भागांत उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ इशारा जारी केला होता. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. शुक्रवारी कमाल तापमान ४२.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
आयएमडीचा चार रंगाचा वापर
हवामान चेतावणी देण्यासाठी आयएमडी चार रंग-आधारित अलर्ट कोड वापरते. हिरवा (कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही), पिवळा (लक्ष ठेवा आणि अपडेट रहा), केशरी (तयार राहा) आणि लाल (कृती) यांचा समावेश आहे. जेव्हा कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि किमान ४.५ अंशापेक्षा जास्त असते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते.
उष्णतेची लाट येण्याची शक्यता
राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण उत्तर प्रदेश आणि दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असे स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष (हवामान बदल आणि हवामानशास्त्र) महेश पलावत म्हणाले.