नवी दिल्ली : परदेशातून सोने आयात करणे आता महाग झाले आहे. कारण सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ७.५ टक्क्यांवरून १२.५० टक्के केले आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या घोषणेनंतर आता सोन्यावर १५ टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. कारण १२.५० टक्के आयात शुल्काव्यतिरिक्त त्यावर २.५० टक्के कृषी इंफ्रास्ट्रक्टर डेव्हलपमेंट सेसदेखील स्वतंत्रपणे आकारला जातो. त्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क उपकर १०.७५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
भारत हा जगातील दुस-या क्रमांकाचा सोन्याचा आयातदार देश आहे. भारत आपली सोन्याची बहुतांश मागणी आयातीद्वारे पूर्ण करतो, ज्यामुळे रुपयावर दबाव येत होता. रुपयाची सातत्याने घसरण होत असल्याने त्याचा परिणाम भारतीय चलनावर दिसून येत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपयाने ७९ रुपयांचा विक्रमी नीचांक गाठला.
१०७ टन सोन्याची आयात
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोन्याच्या आयातीत अचानक वाढ झाली आहे. मे २०२२ मध्ये केवळ १०७ टन सोन्याची आयात झाली होती. त्यानंतर जून महिन्यातही सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात झाल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोन्याच्या आयातीत वाढ झाल्यामुळे चालू खात्यातील तुटीवर दबाव वाढत असल्याने सरकारला सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.