30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयआगामी ५ वर्षात भारत-पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल

आगामी ५ वर्षात भारत-पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : भारताला फाळणी होऊनच स्वातंत्र्यप्राप्ती मिळाली होती. पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्राची निर्मिती फाळणीमुळे झाली होती. मात्र दोन्ही देशांमधील वैर अद्याप कायम आहे. उलट वाढतच चालले आहे. तीन युद्धे होऊनही ते संपलेले नाही. अशातच आता येत्या ५ वर्षांत दोन्ही देशांदरम्यान एक मोठे युद्ध होण्याची शक्यता अमेरिकेतील गुप्तचर संस्था अमेरिकच्या नॅशनल इंटलिजन्स कौन्सिलने दिली आहे. या संस्थेने आतापर्यंत विविध राष्ट्रांबद्दल जे गुप्तचर अहवाल दिले आहेत, ते खरे ठरले असल्याने या अहवालाचेही गांभीर्य वाढले आहे.

अमेरिकेची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलने आपला ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्ट अमेरिकेच्या सरकारकडे दिला आहे. फाईव्ह इयर रिजनल आऊटलूक रिपोर्ट- साऊथ एशिया या प्रकरणात भारत-पाकिस्तानबद्दल भाष्य केले आहे. भविष्यात दक्षिण आशियात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता व अशांतता पसरेल असे या अहवालात नमूद केले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये २०२५ पर्यंत मोठे युध्द होण्याची शक्यता आहे असे अहवालात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर हे युद्ध अनेक दिवस चालणार असून दोन्ही देशांचे मोठ्या संख्येने सैनिक हुतात्मा होतील, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलच्या या अहवालावर पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांत मोठी खळबळ माजली आहे. मात्र भारतात मात्र कोणतीही चर्चा होताना दिसत नाही.

दहशतवादी हल्ल्याचे असणार कारण
दोन्ही देशांमधील युद्धामागे प्रमुख कारण एक मोठा दहशतवादी हल्ला असणार असून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेकडून तो केला जाईल, असे म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करेल आणि युद्ध सुरू होईल असेही अहवालात म्हटले आहे.

अणूयुध्द होण्याची शक्यता नाही
दोन्ही देशांत मोठे युद्ध होण्याची शक्यता असली तरी ते अणूयुध्दामध्ये रुपांतरित होण्याची शक्यता नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. मात्र या युद्धामुळे पुढील अनेक वर्षे या दोन देशांना आणि दक्षिण आशियाला गंभीर आर्थिक परिस्थितीला तोंड द्याले लागणार आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

भारत-चीन दरम्यान चकमकीची शक्यता
अहवालात भारत आणि चीन या दोन देशांच्या संबंधावरही भाष्य केले आहे. दोन्ही देशांदरम्यान गलवानच्या खो-यात जशी चकमक झाली तशीच एखादी घटना येत्या ५ वर्षात पुन्हा घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पुन्हा दोन्ही देश सामंजस्याने वाद मिटवतील, असेही म्हटले आहे.

अफगाणिस्तानमध्येही अशांतता राहणार
अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आपली सेना काढून घेतल्यानंतर तालिबान प्रबळ होईल. पाकिस्तान त्याला त्यासाठी मदत करेल.अफगाणिस्तानात अनेक दहशतवादी गटांना प्रशिक्षित केले जाईल व भारतातील काश्मीर तसेच अन्य भागात दहशतवादी कारवायांसाठी त्यांचा वापर करण्यात येईल, असेही नमूद केले आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष्यही युद्धास कारक
भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धाबाबत युएनडीपी अर्थात युनायटेड नेशन्स डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅमनेही शक्यता व्यक्त केली आहे. मात्र त्यामागील कारण पाकिस्तानातील पाण्याचे दुर्भिक्ष्य हे कारण असेल, असे म्हणण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य पडत असून २०२५ मध्ये ही समस्या विक्राळ रुप धारण करेल. जनतेचा सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण होईल. परिणामी त्यावरुन जनतेचे लक्ष वळविण्यासाठी पाकिस्तान भारतासोबत युद्ध करण्याची शक्यता युएनडीपीने व्यक्त केली आहे.

एएनईसीचे अहवाल प्रभावी
अमेरिकच्या नॅशनल इंटलिजन्स कौन्सिलच्या अहवालांचे खरे ठरण्याचे प्रमाण १००टक्के आहे. संस्थेकडून दर ४ वर्षांनी अहवाल तयार करण्यात येतो. त्यासाठी गुप्तचर खात्याकडून मोठ्या प्रमाणात तपास केला जातो. तिचे माहिती मिळवण्याचे स्त्रोत कोणालाही ठाऊक नाहीत, मात्र त्यांचे आतापर्यंत दिलेले सर्व अहवाल खरे ठरल्याचे सांगण्यात येते.

सीबीएसईची दहावी-बारावीची परीक्षा रद्द करा – अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे विनंती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या