नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ७० हजार ५८९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील रुग्णसंख्येत सलग तिस-या दिवशी घट झाली आहे. सोमवारी ८२ हजार १७० नवे रुग्ण सापडले होते. कालच्या तुलनेत जवळपास १२ हजार रुग्ण कमी झाले आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ६१ लाखांचा टप्पा ओलांडला असून, रुग्णसंख्या ६१ लाख ४५ हजार ५७६ वर पोहोचली आहे.
मृत्यूच्या आकड्यातही हळूहळू घट होत आहे
गेल्या २४ तासांत ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या आकड्यातही हळूहळू घट होत आहे. कारण काल १ हाज ३९ जणांचा मृत्यू झाला होता. सध्या देशात ९ लाख ४७ हजार ५७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ५१ लाख १ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर आतापर्यंत देशातील ९६ हजार ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात दुस-याही दिवशी १९ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे ही बाब समोर येत असतानाच महाराष्ट्राला सलग दुस-या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांत १९ हजार २१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर १४ हजार ९७६ नवे कोरोनाबाधित मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. कालही कोरोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. आतापर्यंत राज्यात १० लाख ६९ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७८.२६ इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.