23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयरणतेजच्या महिलांनी टाकलं ‘पुढचं पाऊल’

रणतेजच्या महिलांनी टाकलं ‘पुढचं पाऊल’

एकमत ऑनलाईन

शिक्षण मंत्र्यांमुळे हटवला डोईवरचा पदर
मेहसाना : गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वधानी यांचा सत्कार करण्याची जबाबदारी मेहसाना जिल्ह्यातील रणतेज गावच्या पहिल्या महिला सरपंच मीनाबा झाला यांच्यावर होती. पारंपरिक प्रथेनुसार पदराने चेहरा झाकलेला असतानाच त्या मंचावर गेल्या. मात्र मंत्र्यांनी समस्त गावक-यांना अनपेक्षित धक्का दिला.

सरपंच मीनाबा झाला या पदराने चेहरा झाकलेल्या, जमिनीवरच बसलेल्या महिलांच्या घोळक्यातून उठून शिक्षणमंत्र्यांना सत्कार करण्यासाठी व्यासपीठावर आल्या, मात्र तेवढ्यात मंत्र्यांनी त्यांना रोखले.
शिक्षणमंत्री जितू वघानी यांनी मीनाबा यांना डोक्यावरचा पदर काढायला सांगितला. डोक्यावरचा पदर काढल्यानंतरच मी सत्कार स्वीकारेन असे त्यांनी सांगितले. सर्व गावक-यांसमोर त्यांनी विचारले की, जर गावातल्या ज्येष्ठांनी परवानगी दिली तर मी मीनाबा यांना विनंती करेन की त्यांनी ही परंपरा मोडावी. मात्र जमावातून जोरदार विरोध झाला. आम्ही राजपूत आहोत, असे चालणार नाही, असे गावकरी म्हणू लागले.

त्यावर शिक्षणमंत्र्यांनीही उत्तर देताना म्हटले, इथं जातीचा काय संबंध? दरबार, पटेल, वाणी, ब्राह्मण… महिला कशा खूश राहतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील? याकडे आपण लक्ष द्यायला हवे. मान मर्यादा वगैरे सगळे ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही एका गावाच्या सरपंच आहात, तेव्हा तुम्ही या परंपरा मोडायला हव्यात.

गावाला हे ठरवू द्या. आजूबाजूला जरा पाहा जग कुठे पोहोचले आहे. डोक्यावरुन पदर हटवल्याने तुमची मान मर्यादा कमी होणार नाही. घरी सगळ्या परंपरांचे पालन करा. परंपरा चुकीची असे मी म्हणत नाही. पण आपल्याला काळानुरुप बदलायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्यातील एका वृद्ध व्यक्तीला मंत्र्यांचे हे म्हणणे पटले. त्यावेळी गावातल्या सर्व महिलांनी डोक्यावरुन पदर हटवला. सरपंच मीनाबा यांना सन्मानाने व्यासपीठावर बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली.स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने त्या दिवशी या गावाने एक मोठे पाऊल टाकले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या