अहमदाबाद : हार्दिक पटेलने काँग्रेस सोडल्याच्या एका दिवसानंतर, पक्षाच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी गुरुवारी दावा केला की, त्याच्यावर दाखल केलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात जाण्याची भीती असल्याने हार्दिक पटेलने हे पाऊल उचलले आहे. हार्दिक पटेल सत्ताधारी भाजपमध्ये सामील होऊ शकतात, असा दावाही ठाकोर यांनी केला.
हार्दिक पटेल यांनी येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर लगेचच काँग्रेस नेत्याने हे दावे केले आहेत. पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी असतानाही आपल्याला कोणतेही अर्थपूर्ण काम दिले जात नसल्याचा आरोप पटेल यांनी केला होता. तसेच हार्दिक पटेल यांनी असा आरोप केला की, पक्षाकडे कोणतीही दूरदृष्टी नाही आणि त्यांची राज्य युनिट जाती-आधारित राजकारण करण्यात गुंतलेली आहे.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर बुधवारी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. या नंतर हार्दिक पटेल यांनी दावा केला की काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचे लक्ष हे त्यांच्या मोबाईल फोनवर असते आणि गुजरात काँग्रेसचे नेते त्यांच्यासाठी चिकन सँडविचची व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या एका वर्षानंतर जुलै २०२० मध्ये त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते.
राजकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकोर यांनी आरोप केला की पटेल यांनी आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत जे काही सांगितले आणि त्यांच्या राजीनामा पत्रात जे काही लिहिले होते ते सत्ताधारी भाजपने तयार केले होते. ठाकोर यांनी दावा केला की, हार्दिकला भीती होती की आपण काँग्रेसमध्ये राहिल्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागेल. त्यामुळे संभाव्य शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपमध्येही सामील होऊ शकतात.