23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयराजस्थान, मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा तडाखा

राजस्थान, मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा तडाखा

एकमत ऑनलाईन

कोटा/जयपूर : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ओडिशानंतर मध्य प्रदेश व राजस्थानच्या दिशेने सरकल्याने या राज्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. राजस्थानातील कोटा व आसपासच्या शहरांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोटामधील सखल भाग जलमय झाला असून बंधा-यातून आतापर्यंत पावणेतीन लाख क्युसेक पाणी सोडले आहे. मध्य प्रदेशात सलग तिस-या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली तर उत्तर ओडिशात सुवर्णरेखा नदीची पूरस्थिती गंभीरच आहे.

सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत राजस्थानातील झालवारमध्ये सर्वाधिक २३४ मि. मी. तर कोटा शहरात २२४ मि. मी. पावसाची नोंद झाली. चितोडगडमधील राणा प्रताप सागर धरण आणि कोटातील जवाहर सागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चंबळ नदीवरील कोटा बंधा-याच्या पाण्याची आवक वाढली. बंधा-यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने अनेक सखल भाग जलमय झाले. कोटामध्ये प्रशासनाने आज सुटी जाहीर केली तर कोचिंग क्लासही बंद ठेवण्यात आले. शहरातील जवाहर नगर, स्टेशन रस्ता आदी भागांत लोकांच्या घरात पाणी घुसले. कोटा व झालवारशिवाय बुंदी, सवाई माधोपूर, दौसा, चित्तोडगड आदी जिल्ह्यांतही अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली.

मध्य प्रदेशात तिस-या दिवशीही पाऊस

मध्य प्रदेशात सलग तिस-या दिवशी मुसळधार पाऊस कायम असल्याने राज्याची राजधानी भोपाळसह जबलपूर व इतर जिल्ह्यांत सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली. हवामान खात्याने पश्चिम मध्य प्रदेशात सोमवारी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. संततधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्या, जलसाठ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. भोपाळमध्ये १९० तर गुणात १७४ मि.मी.पावसाची नोंद झाली.

ओडिशात १०० गावे जलमय
उत्तर ओडिशात मुसळधार पावसामुळे सुवर्णरेखा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती चिंताजनक होती. नदीच्या पुरामुळे १०० पेक्षा अधिक गावे जलमय झाली आहेत. रविवारी संध्याकाळपासून सुवर्णरेखा नदीची पातळी वाढत आहे. उत्तर ओडिशातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. बालासोर व मयूरभंज जिल्ह्यांत लोकांचे स्थलांतर केले जात आहे.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या