नवी दिल्ली : मान्सूनच्या अरबी समुद्रातील प्रवेशानंतर पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात दमदार हजेरी लावल्यानंतर आता हा पाऊस उत्तरेकडे सरकला आहे. दरम्यान, राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे हवामानात बदल झाला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये दिल्ली आणि नोएडा (दिल्ली एनसीआर) च्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. आज सकाळपासून या पावसाचा जोर वाढला आहे.
जोरदार वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून पावसामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. दिल्लीतील अनेक महत्वाच्या भागांत पाऊस सुरु आहे. यामध्ये विजय चौकासह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी आले असल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिल्लीत काल (रविवारी) हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे नोएडाच्या अनेक भागात जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस सुरु आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानाचा अंदाज बदलला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस उत्तर भारतातील हवामान असेच राहील, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. दिल्लीतील अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वा-यामुळे अनेक भागात रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत. धौला कुआन परिसरातही काही झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ते ठप्प झाले आहेत.