21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयगृह, वाहन कर्ज महागणार

गृह, वाहन कर्ज महागणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची (०.५० टक्के) वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट आता ४.९० वरून ५.४० टक्के इतका झाला आहे. या वाढीनंतर व्याजदर ऑगस्ट २०१९ च्या पातळीवर पोहोचले आहेत. रेपो रेटमध्ये वाढ झाल्याने आता गृह आणि वाहन कर्ज महाग होणार आहे.

व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी ३ ऑगस्टपासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. त्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत व्याजदर वाढवण्याबाबत माहिती दिली. पतधोरण समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची किंवा जीडीपीची वाढ ७.२ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय अर्थव्यवस्था महागाईशी झुंज देत असून गेल्या काही महिन्यांत भारतातून १३.३ अब्ज डॉलर्स इतके भांडवल बाहेर गेले असल्याचेही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेत पुरेसे भांडवल खेळते असून जागतिक अर्थव्यवस्थेतील धक्क्यांना पचवू शकेल, एवढे परकीय चलनही भारताकडे असल्याचे दास म्हणाले.

२०२३ मध्ये जीडीपी वाढ ६.७ टक्के अपेक्षित
या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ १६.२ टक्के, दुस-या तिमाहीत ६.२ टक्के, तिस-या तिमाहीत ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ ते ४.१ टक्के अशी असेल. पुढील आर्थिक वर्षात म्हणजे २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष जीडीपी वाढ ६.७ टक्के असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रेपो रेट म्हणजे काय?
भारतीय बँकांना दैनंदिन व्यवहारांसाठी निधीची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक देशातील बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात झाल्यास बँकांना मध्यवर्ती बँकेकडून कमी दराने कर्ज मिळते. परिणामी बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात. या उलट रेपो दरात वाढ झाल्यास बँकांना ज्यादा दराने कर्ज मिळत असल्याने बँकाकडून ग्राहकांना देण्यात येणा-या कर्जांचे दर वाढतात. त्याची झळ ग्राहकांना बसते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या