नवी दिल्ली : देशभरात मॅनहोलची सफाई करताना अनेक दुर्घटना घडतात, यामध्ये अनेकदा सफाई कामगारांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे गटारांच्या मॅनहोलची सफाई करण्यासाठी यांत्रिक पद्धतींचा अवलंब करावा, अशी मागणी सातत्याने होत होती. याबाबत आज बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, गटारांच्या सफाईसाठी यापुढे तांत्रिक यंत्रणा उभारून स्वच्छतेला जोडण्यात येईल. तसेच मॅनहोलमध्ये करण्यात येणारी मानवी सफाई बंद करण्यात येणार आहे.
देशाच्या स्वातंर्त्याच्या सुवर्णकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आम्ही प्रत्येक विभागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: तरुणांना आणि सर्व वर्गातील लोकांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जगामध्ये मंदी असूनही आपला सध्याचा विकासाचा अंदाज ७ टक्के आहे आणि भारत आव्हानात्मक काळात वेगाने विकासाकडे वाटचाल करत आहे. जगभरातील लोकांनी भारताच्या विकासाचे कौतुक केले आहे आणि हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षांसाठी ब्लू प्रिंट आहे. कोविड लसीकरण मोहिमेने देशाला एका नव्या उंचीवर नेले आहे आणि जगाने भारताची ताकद ओळखली आहे.