कोरोनाला रोखण्यासाठी लस विकसित
नवी दिल्ली : जगातील अन्य देशांप्रमाणे भारतातही कोरोना व्हायरसला रोखणारी लस विकसित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांच्या लसी क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत. देशातील सहा शहरात भारत बायोटेकने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत.
दिल्लीच्या एम्स रुग्णालयात शुक्रवारी एका ३० वर्षीय तरुणाला कोव्हॅक्सीन लसीचा ०.५ एमएलचा डोस देण्यात आला. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांना फेज १ आणि फेज २ मानवी चाचण्यांची परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या मदतीने कोव्हॅक्सीनची निर्मिती केली आहे.
पहिल्या टप्प्यात ५०० स्वयंसेवकावर चाचण्या
हैदराबाद, पाटणा, कांचीपूरम, रोहतक आणि नवी दिल्ली या शहरात कोव्हॅक्सीनच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. नागपूर, भुवनेश्वर, बेळगाव, गोरखपूर, कानपूर, गोवा आणि विशाखापट्टणम या शहरातही कोव्हॅक्सीनच्या चाचण्या लवकरच सुरू होतील. पहिल्या फेजमध्ये १८ ते ५५ वयोगटातील ५०० स्वयंसेवकांवर चाचणी होईल. झायडसने विकसित केलेल्या झायकोव्ह-डीच्या सध्या अहमदाबादमध्ये चाचण्या सुरू आहेत. लवकरच देशातील अन्य शहरातही झायकोव्ह-डीच्या चाचण्या सुरु होतील. प्राण्यांवरील चाचणीत झायकोव्ह-डीची लस यशस्वी ठरली आहे.
डोस दिलेल्या रुग्णावर साईड इफेक्ट नाही
दिल्लीत एम्समध्ये युवकाला कोव्हॅक्सीन लसीचा डोस दिल्यानंतर २ तास त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यामध्ये कुठलेही गंभीर साईड इफेक्ट आढळले नाहीत. म्हणून त्याला घरी सोडण्यात आले. आता पुन्हा दोन दिवसांनी आम्ही त्याची तपासणी करू, असे लस प्रकल्पाचे प्रिन्सिपल इन्व्हेसटिगेटर डॉ. संजय राय यांनी सांगितले.
Read More शासकीय वसतिगृहाती कोविड सेंटरला साहित्य भेट