नवी दिल्ली : अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स यांनी नुकतीच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी आरोग्य, हवामान बदल, जी २० अध्यक्षपदासह अनेक मुद्यांवर चर्चा केली. बिल गेट्स यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉग ‘गेट्स नोट्स’मध्ये या बैठकीबद्दल लिहिले आणि भारताचे कौतुक केले.
इनोव्हेशनमध्ये इन्व्हेस्ट केल्यावर काय शक्य होते, हे भारत जगाला दाखवत असल्याचे त्यांनी लिहिले. आरोग्य, विकास आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये भारताच्या ग्रोथबद्दल मी नेहमीपेक्षा अधिक सकारात्मक आहे. मला आशा आहे की भारताने ही ग्रोथ सुरूच ठेवेल आणि जगासोबत आपले इनोव्हेशन शेअर करत राहील.
बिल गेट्स म्हणाले की, प्रभावी, सुरक्षित आणि परवडणारी कोरोना लस बनवण्याची भारताची अद्भुत क्षमता प्रशंसनीय आहे. या लसींनी लाखो लोकांचे प्राण वाचवले आणि इतर आजारांना जगभरात पसरण्यापासून रोखले. ही आनंदाची बाब आहे की गेट्स फाऊंडेशनदेखील काही लसी बनवण्यासाठी भारताला सहकार्य करू शकले.