उज्जैन : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उज्जैनमध्ये भाजपा खासदार अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचे आव्हान दिले. तसेच त्यांनी कमी केलेल्या प्रत्येक एक किलो वजनामागे १००० कोटी रुपये विकास निधी देण्याची घोषणा केली. यानंतर खासदार फिरोजिया यांनी ४ महिन्यात १५ किलोग्रॅम वजन कमी केले. त्यामुळे त्यांना गडकरींकडून १५,००० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
नितीन गडकरी २४ फेब्रुवारीला उज्जैनला विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांनी वरील वक्तव्य केले होते. गडकरींनी खासदार अनिल फिरोजिया यांना आव्हान दिले त्यावेळी त्यांचे वजन १२७ किलो होते. नितीन गडकरींनी आव्हान कमी होणा-या प्रतिकिलो वजनामागे १००० कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचेकबूल केल्यानंतर अनिल फिरोजिया यांनी तातडीने व्यायामाला सुरुवात केली. खाण्याचे शौकीन असणा-या फिरोजिया यांनी व्यायामासोबतच डायट देखील सुरू केला. ४ महिन्यांचा सातत्यपूर्ण व्यायाम आणि आहाराच्या सतर्कतेनंतर आता फिरोजिया यांनी १५ किलो वजन कमी केले. यासह ते १५,००० कोटी रुपये विकास निधी मिळवण्यास पात्र झाले आहेत.
वजन कमी केल्यानंतर अनिल फिरोजिया माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘‘मी जगातील सर्वात महागडा खासदार आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी उज्जैनच्या विकासासाठी ६ हजार कोटी रुपये दिले आहेत. मी आता १५ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे मला आशा आहे की आम्हाला विकास कामांसाठी मोदी, गडकरी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून आणखी निधी मिळेल.’’
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले…
नितीन गडकरी म्हणाले, ‘‘अनिल फिरोजिया यांना मी एक अट घातली आहे. माझं वजन त्यांच्यापेक्षा अधिक होतं. माझं वजन १३५ किलोग्रॅम होतं. आता माझं वजन ९३ किलो आहे. त्यामुळे अनिल फिरोजिया जितके किलो वजन कमी करतील तितके हजार कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघासाठी देईन. अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्यासाठी १ किलोग्रॅममागे १ हजार कोटी रुपये देईन.’’