नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या राष्ट्रीय पक्षाला अध्यक्ष मिळणेही कठीण झाले आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाचा पेच निकाली लागेपर्यंत त्यांची आई सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा या पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली पण तात्पुरत्या स्वरुपात. त्यानंतर अनेक बैठका झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाला आपला अध्यक्ष निवडता आलेला नाही. राहुल गांधी यांचे मन वळवण्याचे अनेकांचे प्रयत्न फोल ठरलेले आहेत. अशा वेळी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे काँग्रेस नेते अशोक गेहलोत हे या पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमर उजाला या न्यूज वेबसाईटच्या म्हणण्याप्रमाणे, अशोक गेहलोत यांना राजस्थानातून दिल्लीला बोलावून घेत अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा पर्याय योग्य असल्याचे काँग्रेसच्या एका गटाचे म्हणणे आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही पक्षाला स्थायी अध्यक्षाची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, हे पद सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार की काँग्रेसच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याचा पर्याय म्हणून विचार केला जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होऊ शकेल.अशोक गेहलोत यांच्याबद्दल बोलायचे तर, ते गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. सोनिया गांधी यांचाही गेहलोत यांच्यावर विश्वास आहे. राजस्थानच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तरुण नेतृत्व म्हणून सचिन पायलट यांच्यावर सोपवण्याऐवजी अनुभवी अशोक गेहलोत यांच्यावरच सोपवण्यात आली तेव्हाही ही गोष्ट स्पष्ट झाली होती.
अशोक गेहलोत यांना मागच्या वर्षीही काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा विचार समोर आला होता. परंतु, खुद्द गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत जाण्याचा प्रस्ताव नाकारल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सध्याही, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आपल्या मंत्रिमंडळ विस्तारावर भर देत आहेत.
अत्याधुनिक शस्त्रांनी सुरक्षादल होणार मजबूत