23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयहिंमत असेल तर अटक करून दाखवा

हिंमत असेल तर अटक करून दाखवा

एकमत ऑनलाईन

कोलकाता : गेल्या दोन-तीन वर्षांपासून भाजप ईडीची भीती दाखवून अनेक राजकीय नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असतानाच, आता आणखी एका नेत्याने भाजपला खुले आव्हान दिले आहे. कोळसा तस्करी प्रकरणात ईडीने शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची सुमारे सात तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

हिंमत असेल तर मला अटक करून दाखवाच, असे खुले आव्हान त्यांनी अमित शहांना दिले आहे. ईडीने बजावलेल्या समन्सनुसार, अभिषेक बॅनर्जी शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोलकाता येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले. या चौकशीनंतर त्यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तोफ डागली आहे.

कोळसा तस्करी आणि प्राण्यांची तस्करी हे सर्व गृह मंत्रालयाच्या अंतर्गत घडले आहे. त्यामुळे याला गृहमंत्री घोटाळाच म्हणायला हवे. गृहमंत्री शहा हे सर्वात मोठे पप्पू आहेत. त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. सर्वात आधी त्यांनी आपल्या मुलाला देशभक्तीचा धडा शिकवावा. प्राण्यांच्या तस्करीचा सगळा पैसा त्यांच्या मुलाकडेच गेला आहे. सीमेवर बीएसएफ तैनात आहे. बीएसएफ कोणाच्या अखत्यारित येते? प्राण्यांची तस्करी होत असताना बीएसएफ काय करत होती? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे. कोळसा तस्करीतून मी पाच पैसेही घेतल्याचे सिद्ध झाले तर माझी खुलेआम फासावर लटकण्याची तयारी आहे. सध्या केंद्रीय गृह मंत्रालय आम्हाला ईडी आणि सीबीआयचा वापर करून घाबरवण्याचे काम करत आहे. पण आम्ही घाबरणार नाही असेही अभिषेक बॅनर्जींनी मोदी सरकारला ठणकावून सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या