मथुरा : मथुरा जन्मभूमी प्रकरणी आज दिवाणी कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणातील सर्व संबंधित पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर लवकरात लवकर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी जुलै महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणातील हिंदुत्ववादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, कोर्टात आम्ही आमचा दावा दाखल केला. त्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी करण्याची तयारी दर्शवली. कोर्टाने सर्व याचिकाकर्त्यांना निर्देश देत या प्रकरणी तातडीने उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. हा मुद्दा तातडीने निकाली काढण्यात यावा, अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी चार प्रतिवादी पक्ष आहेत. हिंदुत्ववादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, ठाकूर यांची जमीन ईदगाह मशिदीला देणे चुकीचे होते. जो करार झाला, तो योग्य नव्हता. त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत, त्याविरोधात कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामध्ये मशिदीचाही समावेश होत असेल तर तीदेखील हटवण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
हिंदुत्ववाद्यांच्या वकिलांनी म्हटले की, ठाकूर यांची मालमत्ता देण्याचा अधिकार कोणालाही नाही. या मालमत्तेची मालकी आमच्या याचिकाकर्त्याची आहे. आम्ही त्यावेळेस झालेल्या बेकायदेशीर कराराला आव्हान देत आहोत. आम्ही कोणत्याही धार्मिक प्रार्थनास्थळाला आव्हान देत नाही, असेही त्यांनी म्हटले.
मथुरेचा वाद काय?
मथुरेतील १३.३७ एकर जमिनीच्या मालकीचा हा वाद आहे. यामध्ये १०.९ एकर जमीन ही श्रीकृष्ण जन्मस्थानाजवळ असून २.५ एकर जमीन ही शाही ईदगाह मशिदीजवळ आहे.
काशी आणि मथुरामध्ये औरंगजेबने मंदिर तोडून त्या ठिकाणी मशीद स्थापन केली असल्याचा दावा करण्यात येतो.
औरंगजेबाच्या आदेशानंतर १६६९ मध्ये काशीमधील विश्वनाथ मंदिर तोडण्यात आले आणि १६७० मध्ये मथुरेतील केशवदेव मंदिर तोडण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर काशीमध्ये ज्ञानवापी मशीद आणि मथुरेत शाही ईदगाह मशिदीची स्थापना करण्यात आली.