नवी दिल्ली : सध्या देशात गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम गव्हाच्या पिठाच्या किंमतीवर देखील होत असल्याचे चित्र दिसत आहे. पिठाच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. केंद्र सरकार गव्हाच्या किंमती कमी करण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. नुकतीच केंद्र सरकारने गव्हाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३० लाख मेट्रिक टन गहू बाजारात आणण्याची घोषणा केली होती.
यानंतर गव्हाच्या दरावर परिमाम होताना दिसत आहे. अशातच सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत २५ लाख मेट्रिक टन गहू विक्रीसाठी बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गव्हाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, भारतीय अन्न महामंडळाकडे गहू विक्रीची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. एफसीआय देशातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे गव्हाच्या विक्रीवर लक्ष ठेवेल. एफसीआयने मार्चअखेर २५ लाख टन गहू विक्रीकरण्याची योजना आखली आहे. त्याची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट केंद्र सरकारने तयार केली आहे.
१२.९८ लाख टन गव्हाची विक्री
केंद्र सरकारने आतापर्यंत दोन फे-यांमध्ये गव्हाचा लिलाव केला आहे. यामध्ये १२.९८ लाख मेट्रिक टन गहू विक्री करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून सध्या ११.७२ लाख मेट्रिक टन गहू विक्रीसाठी सोडण्यात येणार आहे. मार्चपर्यंत हा सर्व गहू विक्री केला जाणार आहे.
लिलावाची तिसरी फेरी २२ फेब्रुवारीला
केंद्र सरकार २२ फेब्रुवारीला गव्हाच्या तिस-या फेरीचा लिलाव करणार आहे. देशभरातील एफसीआयच्या ६२० गोदामांमध्ये गहू उपलब्ध होणार आहे. व्यापारी गहू खरेदी करतील. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
किंमतीत घट होणार
केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम देशातील गहू आणि पिठाच्या किंमतीवर दिसून येत आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गव्हाच्या दरात किलोमागे ५ रुपयांपर्यंतची घट झाली आहे. त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत गहू आणि पिठाच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी व्यापारी, राज्य सरकारे आणि सहकारी संस्था, महासंघ, सार्वजनिक क्षेत्र या उपक्रमाद्वारे गव्हाची विक्री केली जाणार आहे.