25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयलगाम पवारांच्या हाती, तरीही राज्य सरकार अपयशी- राजनाथ सिंह

लगाम पवारांच्या हाती, तरीही राज्य सरकार अपयशी- राजनाथ सिंह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: महाराष्ट्रात शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या हाती लगाम आहे, मात्र तरीही राज्य सरकार अपयशी ठरत आहे. राज्यात तीन पक्ष मिळून सरकार चालवित आहेत की सर्कस सुरू आहे, हेच कळत नाही. सत्तेच्या हव्यासापोटी युतीत निवडणूक लढवूनही शिवसेनेने आमच्यासोबत गद्दारी केली, अशा शब्दात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र सोडले. महाराष्ट्र जनसंवाद या व्हर्च्युअल रॅलीमध्ये ते बोलत होते.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेत आहे. सरकारमध्ये एक माजी मुख्यमंत्रीही सहभागी आहे. विशेष म्हणजे या सरकारचा लगाम हा शरद पवारांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याच्या हाती आहे. मात्र, तरीदेखील सरकार अपयशी ठरते आहे, कारण सकारात्मक काम करण्याची दृष्टीच सरकारकडे नाही. मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांनी १६ – १६ तास रुग्णवाहिका न मिळणे, त्यांना चालतच रुग्णालयात जावे लागणे हे सर्व अतिशय वेदनादायी आहे. त्यामुळे सरकार नावाची गोष्ट महाराष्ट्रात अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडतो. कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकारने आता स्थलांतरित मजुरांची मदत करणारा अभिनेता सोनू सूद यांच्यावरही टीका केली, यावरून सरकारचे नैराश्य लक्षात येते, असे राजनाथ सिंह म्हणाले. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करीत आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

Read More  विविध राज्यातून 11,000 परप्रांतीय पुणे शहरात दाखल

राज्यात तीन पक्षांचे मिळून सरकारच्या नावे सर्कस चालवित असल्याचा टोला राजनाथ सिंह यांनी लगाविला. ते म्हणाले, संकटाच्या काळातही राहुल गांधी म्हणतात की आम्ही सरकारमध्ये असलो तरीही निर्णय प्रक्रियेत सहभागी नाही. जबाबदारीतून पळ काढणे ही तर काँग्रेसची संस्कृती आहे, कारण जबाबदारीशिवाय सत्ता उपभोगणे (पॉवर विदाउट रिस्पॉन्सिबिलीटी) असा काँग्रेसचा जुना शौक आहे. दुसरीकडे शिवसेनेने युतीत राहुन विधानसभा निवडणूक लढविली, मात्र त्यानंतर सत्तेचा हव्यास निर्माण झाल्याने त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. त्यामुळे ही बाळासाहेबांचीच शिवसेना आहे का, असा प्रश्न पडतो, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. दिल्ली येथून त्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यसभा सदस्य आणि भाजप उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, शाम जाजू, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी संरक्षण राज्यमंत्री, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री जयकुमार रावल, गिरीश महाजन आदी सहभागी झाले होते.

भारत – चीन सीमाविवादाप्रकरणी संसदेत उत्तर देणार : भरत – चीन सीमावाद हा दीर्घकाळपासूनचा प्रश्न आहे. सध्याही दोन्ही देशांमध्ये त्याविषयी लष्करी आणि कुटनितीक स्तरावरून चर्चा सुरू आहे. नुकतीच ६ जून रोजी झालेली लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवरील चर्चा यशस्वी ठरली असून चर्चेद्वारेच प्रश्न सोडविण्यावर एकमत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा सन्मान कायम राहील, याची खात्री देशाने बाळगावी. मात्र, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी याप्रकरणी भारतीय सैन्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे, ते दुर्देवी आहे. भारत – चीन सीमाप्रश्नी देशाचा संरक्षणमंत्री म्हणून संसदेत सर्व उत्तरे देणार आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या