फटाक्यांनी भरलेले फळ खाऊन गरोदर हत्तीणीचा मृत्यू प्रकरण
नवी दिल्ली : फटाक्यांनी भरलेलं फळ खायला दिल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-विभागाच्या अधिकाºयाच्या फेसबुक पोस्टमुळे प्रसारमाध्यमांमध्ये आली. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर सर्व स्तरांतून या घटनेचा निषेध केला जात आहे. राजकीय स्तरावरही याची दखल घेण्यात आली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय कुस्तीपटू गीता फोगाट हिने या प्रकरणी तीव्र शब्दांत राग व्यक्त केला आहे. ही घटना पाहून असं वाटतंय की मानवजातीच्या पापांचा घडा भरतो आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे, असे रोखठोक मत तिने या प्रकरणी व्यक्त केले आहे.
प्राण्यांनाही प्रेमाची वागणूक द्या : विराट
घडलेल्या प्रकाराबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही शोक व्यक्त केला आहे. विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेचा निषेध व्यक्त केला असून प्राण्यांनाही प्रेमाची वागणूक द्या, असे आवाहन केले आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकाराबद्दल चीड व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.
मारेक-यांचा शोध सुरू
हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. वन-विभागानेही मारेक-यांचा शोध सुरू केला असून दोषी व्यक्तींना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
Read More इंडस्ट्रीला आणखी एक धक्का : प्रसिद्ध भोजपुरी संगीतकार धनंजय मिश्रा यांचे निधन